डॉ. गीताली टिळक यांचे प्रतिपादन

पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या काळात मानवाला यंत्राशी स्पर्धा करावी लागत आहे. या स्पर्धेत आपण टिकलो नाही, तर यंत्र मानवावर प्रभावी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे स्पर्धेला तोंड देणे, तर दुसरीकडे मुलांना संस्कारित करून त्यांना वाचनाकडे वळविण्याचे दुहेरी आव्हान आपल्यासमोर असल्याचे मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी व्यक्त केले.

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कारांचे वितरण डॉ. टिळक यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, विश्‍वकर्मा प्रकाशनचे विशाल सोनी, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज.गं. फगरे, संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम शुक्रवार पेठेतील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात पार पडला.

डॉ. टिळक म्हणाल्या, मानवाची स्पर्धा आता संगणकाबरोबर आहे. संगणक अधिक सक्षम आहे. त्यामुळे ज्ञानासह संस्कारानेही आपल्याला समृद्ध व्हावे लागेल. येणार्‍या पिढीलाही समृद्ध करावे लागेल. मातृभाषा आणि पुस्तकांपासून आजची पिढी दूर जात आहे. दुरावत असलेल्या पिढीला पुन्हा वाचन आणि संस्काराकडे वळविण्याचे काम बाल साहित्यिकांनी केले पाहिजे, असेही डॉ. टिळक यांनी नमूद केले.

मुलांचा बौद्धिक विकास करण्यासाठी नुसत्या कथा, कवितांचा उपयोग नाही, तर चित्र रंगवा, कोडी सोडवा, शब्दकोडे आदीसह अन्य प्रकाराचा वापर केला पाहजे. प्रत्येक मुलांत कोणती ना कोणती कला असते. त्या कलेचा विकास करण्यासाठी आम्ही सा. ‘छावा’च्या माध्यमातून मुलांसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. मुलांचा सर्वांगीण विकास करणारी साधने वाढली पाहिजेत. मुलांमध्ये मातृभाषेविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी शासन, तसेच साहित्य संस्थांच्या पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही डॉ. गीताली टिळक यांनी व्यक्त केली.

डॉ. न.म. जोशी म्हणाले, बालसाहित्य हे मोठ्या साहित्याच्या वर्तुळातील केंद्रबिंदू असणारे एक वर्तुळ आहे. बाल साहित्यात विचार आहे. त्यामुळे बालकांना पडणारे प्रश्‍न बालसाहित्यिकांनी सोडविले पाहिजेत. मुलांची बुद्धी जागृत असते. ती जागरूक बुद्धी सांभाळण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे. सावित्री जगदाळे, संजय गोरडे, शिवाजी चाळक, वीरभद्र मिरेवाड, समाधान शिकेतोड, सिद्धेश्वर म्हेत्रे, रघुराज मेटकरी, रमेश कोटस्थाने व पूर्ण प्रथमिक शाळा तिवरे, कणकवली यांना यावेळी गौरविण्यात आले. ज.गं. फगरे, विशाल सोनी, राजन लाखे, कविता मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कवयित्री कविता मेहेंदळे यांच्या ‘प्रसादाची करंजी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते झाले. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा