चेन्नई : आयपीएल 2023 सध्या एका रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. आज, 23 मे रोजी चेन्नई आणि गुजरातचे संघ फायनलमध्ये पोहचण्याच्या शर्यतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने आयपीएल सामन्यांदरम्यान सुरू असलेल्या मोठ्या बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील शाहदरा येथील राणी गार्डन परिसरातून याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पंकज बजाज, अजय मल्होत्रा आणि अतुल वर्मा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चार मोबाईल फोन, चार्जरसह एक डेल आणि एसर लॅपटॉप, वाय-फाय राउटर जप्त करण्यात आले. दिल्ली पब्लिक गॅम्बलींग अ‍ॅक्ट, 1955 च्या कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफ लढतींना आजपासून सुरुवात होणार आहे. चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यामध्ये क्वालिफायर वन लढत होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दहाव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाला असेल.

हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. या लढतीत पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. लखनौ सुपर जायंटस् व मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत विजयी होणारा संघ क्वालिफायर वन लढतीत पराभूत झालेल्या संघाशी भिडणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा