घरच्या मैदानावर खेळत असल्याने चेन्नईचे पारडे जड

चेन्नई : आयपीएल 2023 आजपासून बाद फेरीचे सामने सुरु होणार आहेत. आज (मंगळवारी) चेन्नई आणि गुजरात यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनलचे तिकिट मिळेल. या सामन्यातील पराभव होणार्‍या संघाला एलिमिनेटर सामना खेळून मगच अंतिम सामन्याचे तिकिट मिळविता येईल.

चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. परंतु गतविजेत्या गुजरातला हरविणे चेन्नईला फारसे सोपे असणार नाही. कारण गुजरात संघाची सध्याची कामगिरी पाहता ते का आयपीएल 2022 चे विजेते आहेत ते स्पष्ट दिसत आहे.

दुसरीकडे चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील यंदा कमाल केली आहे. त्यामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनीची भूमिका महत्त्वाची आहेच, कारण योग्यवेळी योग्य गोलंदाजाला गोलंदाजी देणे देखील महत्त्वाचे असते तेच यंदा धोनीने केले आहे. दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश ठीकशाना, रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यावर धोनीने टाकलेला विश्‍वास आणि त्याच्या विश्‍वासावर त्यांनी केलेली कामगिरी हेच चेन्नईच्या विजयाचे गमक आहे. अशीच कामगिरी त्यांना बाद फेरीतही कायम ठेवावी लागणार आहे. फलंदाजीत चेन्नईसाठी यंदा डेवन कॉनवे, रुतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, आणि शिवम दुबे यांनी योग्यवेळी मोठी खेळी करुन संघाला विजयापर्यंत नेले आहे. तसेच शेवटच्या षटकांमध्ये धोनीची फटकेबाजी संघासाठी उपयुक्त ठरली आहे. अजिंक्य राहणेचा फलंदाजीतील नवा अवतार चेन्नईसाठी आणि त्याच्यासाठी देखील फायदेशीर ठरला आहे.

एकूणच उद्याच्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवायचा असल्यास गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही भूमिकांमध्ये सर्वोकृष्ट कामगिरी करावी लागेल. चेन्नई आणि गुजरातच्या शक्यतांबद्दल बोलायचे झाले तर 60 हा टक्के चेन्नई जिंकू शकतो. तर गुजरातचा संघ 40 टक्के
पुढे राहू शकतो.

गिलला रोखण्याचे आव्हान

गोलंदाजीत गुजरातकडे मोहम्मद शमी, राशिद खान हे दोन हुकमी एक्के आहेत. तसेच मोहित शर्मा, नूर अहमद यांनी देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. गुजरातची फलंदाजीही सातव्या क्रमांकापर्यंत आहे. सलामीवीर शुबमन गिल ज्या पध्दतीने फलंदाजी करत आहे. ते पाहता त्याला रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान असणार आहे. गिलने मागील दोन सामन्यात शतकी खेळी केली आहे. त्यानंतर विजय शंकरने देखील यंदाच्या हंगामात फलंदाजीत कमाल केली आहे. शेवटच्या पाच षटकांत फटकेबाजी करण्यासाठी गुजरातकडे कर्णधार हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान हे तगडे खेळाडू आहेत. परंतू चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर गुजरातचे फलंदाज कशी फलंदाजी करतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा