चर्चेतील चेहरे : राहुल गोखले

ईशान्येतील मणिपूर राज्यात ‘मैतेई’ समाजाला अनुसूचित जमातीचादर्जा व पर्यायाने आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे तेथील नागा तसेच कुकी या आदिवासी समाजात असंतोष माजला आणि हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकात 60 जणांचा बळी गेला. याचे खापर विरोधक तेथील मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यावर फोडत आहेत. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिस्थिती हाताळत होते आणि आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. बिरेन सिंह यांनी त्यासाठी अमित शहा यांचे आभार मानले आहेत; मात्र म्हणून आपल्या ढिसाळ कारभाराच्या आरोपांतून बिरेन सिंह यांची सुटका होऊ शकत नाही.

बिरेन सिंह यांचा प्रवास फुटबॉलपटू ते पत्रकार ते राजकारणी असा राहिला आहे. राजकारणात देखील पक्षांतर करीत 2016 मध्ये ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. तेंव्हा भाजपशी देखील त्यांचा घरोबा दीर्घकाळापासून आहे असे नाही. 1 जानेवारी 1961 रोजी इम्फाळ येथे जन्मलेले सिंह हे फुटबॉलपटू म्हणून स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत असत. अशाच एका स्पर्धेत खेळत असताना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बिरेन सिंह यांना हेरले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना बीएसएफच्या फुटबॉल संघातर्फे खेळण्याची संधी मिळाली. मणिपूरमधून बीएसएफ संघात समाविष्ट असणारे आणि राज्याबाहेरच्या फुटबॉल स्पर्धेत खेळणारे ते पहिलेच खेळाडू ठरले. ड्युरांड करंडक स्पर्धेत 1981 मध्ये बीएसएफ संघाने मोहन बागान संघाचा पराभव केला; त्या संघात सिंह देखील होते. अर्थात बीएसएफ संघाशी त्यांचा संबंध वर्षभरच टिकला. त्या संघाला सिंह यांनी रामराम ठोकला; मात्र पढे सुमारे दहा वर्षे ते फुटबॉल खेळत होते. त्यांचा तोच पिंड राजकारणात देखील दिसला. एकेका पक्षात प्रवेश करायचा आणि मग त्या पक्षाला सोडचिठ्ठी द्यायची हा त्यांचा राजकीय प्रवासाचा सारांश आहे.

मात्र राजकारणाशी त्यांचा संबंध उशीरा आला. फुटबॉलपटू म्हणून क्रीडांगणावर आपली कारकीर्द घडवत असतानाच 1992 मध्ये त्यांनी पत्रकारितेतच्या क्षेत्रात प्रवेश केला. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र सुरु केले. याच वर्तमानपत्रात दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ बातम्या प्रसिद्ध केल्याने त्यांच्या वर्तमानपत्रावर सरकारी यंत्रणांनी छापा घातला. त्यांनीच एका नियतकालिकाला दिलेल्या एका मुलाखतीत ‘त्यावेळी आपल्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती; मात्र आपण जामीन न घेता यंत्रणांनी आरोप सिद्ध करावे असे आव्हान दिले. आपण खटला जिंकलो; महिनाभर आपण अटकेत होतो’ अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

2021 मध्ये बिरेन सिंह मणिपुरचे मुख्यमंत्री झाले होते; तेंव्हा राज्यातील दोन पत्रकारांवर वेब पोर्टलवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या पत्रकारांनी दिलेले स्पष्टीकरण, पत्रकार संघाची मध्यस्थी आणि बिरेन सिंह यांनी घेतलेली सौम्य भूमिका यांमुळे त्या पत्रकारांची सुटका करण्यात आली आणि त्यांच्यावरील गुन्हेदेखील मागे घेण्यात आले. त्यावेळी बिरेन सिंह यांनी आपल्या स्वानुभवाचे बोल सुनावले होते.

अर्थात बिरेन सिंह यांचे ते औदार्य नेहेमीच दिसले अशातला भाग नाही. कोरोनाची परिस्थिती बिरेन सिंह प्रशासनाने ज्या पद्धतीने हाताळली त्याची एकीकडे प्रशंसा झाली; तरी काही अंशी टीकाही झाली. मात्र ती टीका करणार्‍यांपैकी काहींना अटक करण्यात आली. मानवाधिकार संघटनांनी त्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यापर्यंत प्रकरण गेले.मणिपूर विद्यापीठातून कला शाखेतील पदवीधर झालेले बिरेन सिंह यांनी 2001 पर्यंत संपादक या नात्याने हे वर्तमानपत्र चालविले. मात्र त्यानंतर त्यांना राजकीय क्षेत्र खुणावू लागले. 2002 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डेमोक्रॅटिक रेव्होल्यूशनरी पीपल्स पार्टी या प्रादेशिक पक्षाने 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी केवळ दोघेच जण निवडून येऊ शकले- त्यातील एक होते बिरेन सिंह. हैनगाँग मतदारसंघातून ते विजयी झाले मात्र वर्षभरात ते काँग्रेसच्या तंबूत शिरले. तेथे त्यांना लगेचच मंत्रिपद मिळाले. ओक्राम इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिरेन सिंह हे वन-पर्यावरण खात्यांचे मंत्री होतेे. त्यांनी लवकरच इबोबी सिंह यांचा विश्वास संपादन केला. साहजिकच त्या पुढच्या म्हणजे 2007 च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी बिरेन सिंह यांना मिळाली आणि ते विजयी झाले. सिंचन, क्रीडा अशा महत्वाची खाती मंत्री म्हणून बिरेन सिंह यांच्या वाट्याला आली.2012 सालच्या निवडणुकीतही बिरेन सिंह विजयी झाले; मात्र तोवर इबोबी सिंह आणि बिरेन सिंह यांच्यातील संबंध दुरावू लागले होते. जवळपास तेरा वर्षे इबोबी सिंह हे बिरेन सिंह यांचे मार्गदर्शक होते; मात्र त्याच इबोबी सिंह यांच्यावरीरोधात बिरेन सिंह यांनी 2016 मध्ये बंड केले. काँग्रेसचा राजीनामा देत त्यांनी भाजपशी सलगी केली. बिरेन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने इबोबी सिंह दुर्बल होतील अशी अपेक्षा होती. मात्र 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला; पण बहुमत गाठू शकला नाही.

बिरेन सिंह त्याही निवडणुकीत जिंकले होते; मात्र भाजपचे उमेदवार म्हणून. तो त्यांचा सलग चौथा विजय होता. त्यांनी पुढाकार घेत अन्य छोटे पक्ष आणि काँग्रेसमधील काही आमदार यांना एकत्र करीत सत्तेवर दावा केला. त्यांच्या रूपाने मणिपूरला पाहिला भाजप-मुख्यमंत्री लाभला. त्या कार्यकाळात बिरेन सिंह यांनी ’गो टू हिल्स’, ’गो टू व्हिलेजेस’ अशा योजना सुरु केल्या. खेडेगावांतील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ करून देण्यासाठी या योजना होत्या. अनेक विकासकामांना आणि कृषीयोजनांना देखील बिरेन सिंह यांनी चालना दिली. मात्र साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय असूनही तरुणांमधील बेरोजगारी, मणिपूर-नागालँड सीमावर्ती गावांमधील संघर्ष अशी अनेक आव्हाने देखील होती. त्यावर समाधानकारक तोडगा ते काढू शकले नाहीत. तरीही 2022 च्या निवडणुकीत बिरेन सिंह यांनी भाजपला मणिपूरमध्ये बहुमत मिळवून दिले. पाच वर्षे अस्थिर सरकार चालवून देखील बिरेन सिंह यांनी भाजपची सदस्य संख्या 2017 मधील 21 वरून 2022 मध्ये साली 32 पर्यंत वाढ वली े ही त्यांची मोठी कामगिरी. तेच पुन्हा मुख्यमंत्री होणे हा केवळ एक उपचार होता. अशाच वेळी एकाधिकारशाही वाढण्याचा संभव असतो. बिरेन सिंह यांच्याबाबतीत तेच घडले.

गेल्या एप्रिलमध्ये भाजपने बोलावलेल्या बैठकीला पक्षाच्या काही आमदारांनी दांडी मारली होती; तेंव्हाच बिरेन सिंह यांच्याविरोधात असणार्‍या असंतोषाची चिन्हे दिसू लागली होती. त्यानंतर किमान चार आमदारांनी महामंडळ अध्यक्ष अथवा तत्सम पदांवरून राजीनामे दिले होते. मणिपूर भाजपमधील काही नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी तळ ठोकला आहे;. बिरेन सिंह यांनी मात्र पक्षात कोणतीही नाराजी नाही आणि जे दिल्लीत गेले आहेत ते वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेले आहेत असा पवित्रा घेतला आहे. मात्र बिरेन सिंह यांच्याविरोधात मणिपूर भाजपमध्ये असंतोष आहे यात शंका नाही. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. 2019 मध्येही बिरेन सिंह यांच्याविरोधात बंडाचे स्वर उठले होते; मात्र बंडखोरांची ताकद कमी पडली आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिरेन सिंह यांना पाठबळ दिले. 2021 मध्येजॉय कुमार सिंह यांच्याकडून खाती काढून घेतल्यावर बिरेन सिंह असेच अडचणीत आले होते. चार मंत्र्यांसह नऊ आमदारांनी राजीनामे दिले होते. पुन्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला आणि बिरेन सिंह बचावले.

मात्र आता पुन्हा त्यांच्याविरोधात असंतोष भडकला आहे. आदिवासींविरोधी अजेंडा बिरेन सिंह आक्रमकपणे राबवत आहेत असाही त्यांच्यावर आरोप होत आहे. मणिपूरमधील भयावह हिंसाचाराने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला देखील बिरेन सिंह यांचा बचाव करणे तितकेसे सोपे नाही. शिवाय बिरेन सिंह यांना हटविण्याचे सूर पक्षातूनच उठू शकतात. कधीकाळी फुटबॉल खेळणार्‍या बिरेन सिंह यांनी यावेळी स्वयंगोल केला आहे. त्यांचे मुख्यमंत्रिपद आता दोलायमान झाले आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा