मुंबई : महिला सक्षमीकरणाची संकल्पना व्यापक प्रमाणात कृतिशील होण्यासाठी महिलांचे हक्क, त्यांचे प्रतिनिधित्व आणि प्रगतीसाठीची साधने त्यांना सहजतेने उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे टीसर संस्थेच्या वतीने आयोजित डिजीटॉल या चर्चासत्रात त्या बोलत होत्या.

फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि कॅनडा या देशांनी एकत्रितपणे करीत असलेल्या महिलांविषयक कामाचा प्रारंभ असलेला हा कार्यक्रम होता.
यावेळी डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमातून महिलांना त्यांच्या क्षमता सिद्ध करणे शक्य होणार असले, तरी त्यासाठी आवश्यक असणारी माध्यमे स्मार्टफोन, लॅपटॉप, इतर पूरक आधुनिक साधने, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण या बाबी सहजतेने मिळत नाही. त्यादृष्टीने महिलांना व्यापक संधी देण्याची मानसिकता समाजात वाढीस लागणे आवश्यक आहे. एक दशलक्षाहून अधिक महिला निर्णय प्रक्रियेत आहेत, ते लक्षात घेता महिलांच्या हक्क, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संसाधनाच्या उपलब्धतेसाठी आणखी भरीव प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, ’महाराष्ट्र राज्यात महिला आर्थिक विकासासाठी अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या गेल्या आहेत. त्यासोबतच माविम, उमेद, स्त्री आधार केंद्र यासारख्या शासकीय आणि स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सबलीकरणाला केंद्रीभूत ठेऊन उपक्रम राबवले जात आहेत. त्याचप्रमाणे लवकरच राज्य शासनाचे चौथे महिला धोरण जाहीर होणार आहे.’
यावेळी सर्व ज्येष्ठांना हस्तकला कारागिरांनी बांबूपासून तयार केलेल्या भारतीय ध्वजाच्या विशेष प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यावेळी टिसर संस्थेच्या डॉ. मेधा फणसळकर, डॉ. अनिता तोष्णीवाल, रंग दे संस्थेचे रामकृष्ण एन. के., प्रत्युष पांडा, मेक्सिकोचे कॉन्सुलेट जनरल अडॉल्फ ग्रेसिया एत्राडा, हेमंत गुप्ता, हनीशा वासवाणी, डॉ. अमीना चरणीया व अन्य उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मेधा फणसळकर यांनी केले. आभार सी. जी. सेरे चार्लेट यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा