वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) वाराणसी दौर्‍यावर आहेत. यामध्ये पंतप्रधान 1 हजार 750 कोटी रुपयांच्या प्रकल्प घोषणा करण्याची शक्यता आहे. यासोबतच 200 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 20 प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान 9 प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. देशातील पहिल्या शहरी वाहतूक रोपवेची पायाभरणी शुक्रवारी होणार आहे. काशीवासीय बर्‍याच दिवसांपासून अर्बन ट्रान्सपोर्ट रोपवेची वाट पाहत होते. या रोपवेच्या उभारणीसाठी 664.49 कोटी रुपये खर्च येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रोपवे वाराणसीच्या 5 स्थानकांमधून जाणार आहे. कॅन्ट ते गोदौलिया हे अंतर अवघ्या 16 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सिगरा स्टेडियमच्या फेज 2 आणि 3 च्या बांधकामासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही ते करणार आहेत. पंतप्रधान मोदी काशीमध्ये एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कौशल शर्मा आणि पोलिस आयुक्त मुथा अशोक जैन यांनी सर्किट हाऊसमध्ये बांधलेल्या इमारतीची पाहणी केली आहे. जागतिक क्षयरोग (टीबी) दिनानिमित्त पंतप्रधान मोदी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र-समर्थित संस्था ’स्टॉप टीबी’ यांनी आयोजित केलेल्या ’वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशभरात संक्षिप्त क्षयरोग प्रतिबंधक उपचाराचा (टीपीटी) अधिकृत शुभारंभ म्हणून क्षयरोग मुक्त पंचायती आणि क्षयरोगासाठी कुटुंब-केंद्रित काळजी मॉडेलसह अनेक प्रकल्प सुरू करतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा