बँकॉकमधील घटना; हल्‍लेखोराची आत्महत्या

बँकॉक : थायलंडमध्ये बुधवारी बंदूकधार्‍याने केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत. राजधानी बँकॉकच्या अग्‍नेय भागात घरात शिरलेल्या बंदूकधार्‍याने हा गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

हल्ल्यानंतर पोलिसांनी संशयिताला जेरबंद करण्यासाठी घराला घेरल्याचे क्षण दूरचित्रवाणीवर प्रसारीत झाली. त्यानंतर शहरात एकच घबराट पसरली होती. पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरून वस्तू पुरवठा करणार्‍यासह तिघांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी हल्‍ला झाला होता. गोळीबारानंतर घराच्या परिसरात आग लागली होती. गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाचा मृतदेह घराबाहेर पडल्याचे ड्रोनच्या पाहणीत स्पष्ट झाले. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील शाळांमधील मुलांना सुरक्षितस्थळी हलवले. याच काळात संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी घराला वेढले होते. विशेष कृती दलाचे जवान घरात घुसून हल्‍लेखोरावर हल्‍ला चढविण्याचा विचारही करत होते. पोलिसांनी तातडीने पावले उचलून हल्‍लेखोराची ओळख देखील पटवली. अनुवात वेंटटॉग (वय 29) असे त्याचे नाव असल्याचे फेसबुकवर प्रसारित केले गेले. तो अमली पदार्थ प्रकरणातील संशयित गुन्हेगार होता. या प्रक़रणी आरोपपत्र दाखल झाले होते त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होता. तत्पूर्वीच त्याने गोळीबार करुन गोंधळाचे वातावरण तयार केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा