नवी दिल्ली / लंडन : ब्रिटनमधील लंडन येथील भारतीय उच्च आयुक्तालयाबाहेर धुडगूस घालणार्‍या अमृतपाल समर्थकांविरोधात कारवाईस दुर्लक्ष केल्याने केंद्र सरकारने भारतातील ब्रिटिश उच्च आयुक्तालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत बुधवारी कपात केली. त्यानंतर, ब्रिटनने तातडीने भारतीय उच्च आयुक्तालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. उच्च आयुक्तालयाबाहेर अतिरिक्त जवान तैनात करतानाच बॅरिकेड्स उभे केले.

‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अणि फुटीरतावादी अमृतपाल सिंग याच्याविरोधात पंजाब पोलिसांनी कारवाई हाती घेतली आहे. अमृतपाल अद्याप हाती लागला नसला, तरी त्याच्या 100 हून अधिक साथीदारांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित असली, तरी कारवाईचे पडसाद ब्रिटनमध्ये उमटले. अमृतपालच्या समर्थकांनी आयुक्तालयाची तोडफोड केली. तसेच, तिरंग्याचा अवमान केला. दुसरीकडे, भारतीय नागरिकांच्या संघटनांनी एकत्र येत इंडिया हाऊस परिसरात कारवाईचा निषेध केला.

दरम्यान, भारतीय दूतावासाबाहेर धुडगूस घालणार्‍या अमृतपाल समर्थकांविरोधात कारवाई करण्याची मागणी भारत सरकारने केली. मात्र, ब्रिटिश सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ब्रिटनच्या उच्च आयुक्तालयाबाहेरील अतिरिक्त बॅरिकेड्स हटविले. उच्च आयुक्तालयाबाहेरील सुरक्षेत कपात करण्यात आली असली, तरी अंतर्गत सुरक्षा कायम असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. अमृतपालविरोधातील कारवाईमुळे संतापलेल्या समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय उच्च आयुक्तालयात धुडगूस घातला होता.

पंजाब विधानसभेत गदारोळ

कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची काँग्रेसची मागणी

चंडीगड : पंजाब विधानसभेत बुधवारी जोरदार गदारोळ झाला. कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची मागणी काँग्रेसने केली. मात्र, अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांनी यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. तसेच, फुटीरतावादी अमृतपाल सिंग याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावल्याचा निषेध केला.

प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत स्थगन प्रस्ताव आणला. मात्र, सभापतींनी तो फेटाळला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेकडे धाव घेतली व सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली.

शून्य प्रहरात शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंह अयाली यांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ’वारिस पंजाब दे’ या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. तसेच, राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले. गेल्या शनिवारी अमृतपालविरोधात पंजाब पोलिसांनी कारवाई हाती घेतली. अमृतपाल पोलिसांना गुंगारा देत दुचाकीवर फरारी झाला. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अमृतपालने वेशभूषा बदलली असून त्याने गुलाबी फेटा, काळा गॉगल घातलेला अमृतपाल दुचाकीवरून फिरताना दिसला आहे. दरम्यान, अमृतपाल ज्या दुचाकीवरून फरारी झाला ती दुचाकी जालंधरमधील एका कालव्याजवळून जप्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा