नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा 20 ते 21 मार्च दरम्यान भारत दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही नेते परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
भारत आणि जपान यांच्यात मार्च 2022 मध्ये झालेल्या शिखर बैठकीनंतर, आता द्विपक्षीय स्तरावर एकत्र येण्याची ही महत्त्वाची वेळ आहे. कारण भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये अनुक्रमे जी-20 आणि जी-7 अध्यक्षता करत आहेत.
दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्यसेवा यांच्यासह अनेक उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भागीदारी आहे. किशिदा यांच्या भारत भेटीदरम्यान, अन्न आणि आरोग्य सुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि आर्थिक स्थिरता यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
केवळ 120 तरुणांना मिळाल्या नोकर्या
भारत आणि जपानमध्ये एक करार झाला त्यावेळी भारत सरकारचे तत्कालीन कौशल्य विकास मंत्री म्हणाले होते की, पाच वर्षांत तीन लाख भारतीय तरुणांना जपानच्या गरजेनुसार प्रशिक्षित देण्यात येईल. त्याद्वारे 50 हजार तरुणांना तिथे कायमस्वरूपी नोकर्याही मिळतील. परंतु, परराष्ट्र मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, केवळ 606 तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यापैकी 120 जणांना नोकर्या मिळाल्या आहेत.
जपान हा ’अत्यंत महत्त्वाचा भागीदार’ आहे. भारत जपानसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. जपानचे माननीय पंतप्रधान सोमवारी भारताच्या भेटीला येणार आहेत, आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.