अयोध्या : अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. सप्टेंबर 2023 मध्ये मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. या अगोदर मंदिराचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण होईल असा दावा केला होता. परंतु तीन महिने अगोदरच ते तयार होणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शुक्रवारी दिली.

ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गुप्‍ता यांनी सांगितले की, आम्हाला विश्‍वास आहे की, मंदिर तीन महिने अगोदरच बांधून तयार होईल. खरे तर डिसेंबर 2023 अखेर ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु बांधकाम वेगाने सुरू असल्याने मंदिर सप्टेंबर 2023 मध्ये तयार होणार आहे. सध्या अष्टकोनी गर्भगृहाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ 167 खांब उभारण्याचे काम बाकी आहे. मे-जून महिन्यात मंदिराच्या छताचे काम सुरू होणार आहे.

मंदिराच्या बांधकामाची छायाचित्रे ट्रस्टने शुक्रवारी सार्वजनिक केली. त्यात गर्भगृहाचे खांब उभारल्याचे दिसते. गर्भगृहाकडे जाणार्‍या 32 पैकी 24 पायर्‍यांचे काम झाले आहे. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, मंदिराचे काम वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे. गर्भगृहाच्या तुळयांचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. 200 तुळयांचे नक्षीकाम पूर्ण झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा