गारपीट नाही; मेघगर्जनेसह कोसळणार

पुणे : राज्यात ठिकठिकाणी पडत असलेला पाऊस आणखी दोन दिवस कायम असणार आहे. आज (शनिवारी) विदर्भात काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र मेघगर्जना आक्षि वीजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात येत्या सोमवारपासून पाऊस कमी होणार असल्याचेही हवामान विभागाने शुक्रवारी स्पष्ट केले.

येत्या तीन दिवसांनंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळणार आहे. मुंबईसह ठाणे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात घसरलेले दुपारचे कमाल तपमान रविवारपर्यंत कायम असणार आहे. सोमवारपासून तपमानात सुमारे 3 डिग्रीने पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मात्र वाढलेल्या कमाल तपमान पुढील पाच दिवस कायम असणार आहे. मागील 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. काल राज्यात ब्रम्हपुरी येथे उचांकी 38.2 अंश कमाल तपमानाची, तर महाबळेश्‍वर येथे नीचांकी 15.8 अंश किमान तपमानाची नोंद झाली.

समुद्र सपाटीपासून 4 ते 5 किमी उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. हवेच्या कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे सरकत होता. तसेच बंगालच्या उपसागरातून आग्नयेकडे आर्द्रतायुक्त पट्टा कार्यरत होता. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण

शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा होता. काल सायंकाळी आकाशात काळे ढग जमले होते. मात्र रात्रीपर्यंत शहरात पाऊस पडला नाही. शहरात उद्या (रविवार) पर्यंत मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. सोमवारपासून मात्र आकाश नीरभ्र असणार आहे. काल शहरात 31 अंश कमाल, तर 18.6 अंश किमान तपमानाची नोंद झाली. सोमवारपासून शहर आणि परिसरातील तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा