पीएमआरडीए देणार संचलन तूट

पुणे : पीएमपीची संचलन तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांप्रमाणेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) संचलन तूट पीएमपीला देणार आहे. संचलन तूट कमी होणार असल्याने पीएमपीची भाडेवाढही टळली जाण्याची शक्यता आहे.

पीएमपीच्या विविध विषयांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शुक्रवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. या दोन्ही शहरांतील किमान दहा लाख प्रवासी दररोज पीएमपीतून प्रवास करतात. या दोन्ही महापालिका दर वर्षी पीएमपीला संचलन तुटीपोटी काही रक्कम अदा करतात. गेल्या काही वर्षांपासून पीएमपीची संचलन तूट सातत्याने वाढत आहे. पीएमपीचे अनेक मार्ग तोट्यात असून, देखभाल-दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे पीएमपीला दोन्ही महापालिकांकडून निधी देण्यात आल्यानंतरही पीएमपीला निधीची कमतरता जाणवत होती. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचे विचाराधीन होते. मात्र पीएमआरडीएकडूनही संचलन तूट देण्यात येणार असल्याने प्रस्तावित भाडेवाढ टळल्याचे स्पष्ट झाले.

सन २००४ पासून पीएमपीची भाडेवाढ न झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पीएमपीला सहन करावा लागत होता. हा ताण कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील बससेवेनुसार तूट देत होती. पण तरीही पीएमपीवरील ताण कमी होत नाही. त्यामुळे आता यापुढे पीएमआरडीएनेदेखील यात आपला भाग उचलून पीएमपीवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त पीएमपीचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. तसा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा