मुंबई : दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाइन तयार करण्यात येईल. जेणेकरुन या हेल्पलाइनवर ग्राहकांना दूध भेसळीबाबत तक्रार करता येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी राज्यातील दूध व्यवसायातील अडचणींबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले, सध्या राज्यात 70 टक्के दूध संकलन हे खासगी क्षेत्राकडून, 30 टक्के दूध संकलन हे सहकारी क्षेत्राकडून केले जात आहे. जागतिकीकरण आणि खुली स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दुधाचे दर हे बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात. खासगी क्षेत्रातील दूध व्यावसायिक आणि त्यांच्या मार्फत खरेदी-विक्री करण्यात येणार्या दुधाच्या दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.