मुंबई : वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसाच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. भारताचा युवा फलंदाज के. एल. राहुल याच्या नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताला ही विजयी सलामी देता आली. तर त्याला रवींद्र जाडेजाने नाबाद 45 धावा करत मोलाची साथ दिली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकांत 188 धावांवर गारद झाला. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने 39.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुलने तगडे पुनरागमन केले. दोघांमध्ये सहाव्या बळीसाठी 108 धावांची नाबाद शतकी भागीदारी झाली. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता पुढील एकदिवसाचा सामना रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. भारताने वानखेडे मैदानावर तब्बल 16 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खुपच खराब झाली. चौथ्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाकडून दमदार फलंदाजी करणारा ट्रॅव्हिस हेड फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसर्‍या बळीसाठी 72 धावांची भागीदारी केली. मात्र हार्दिक पांड्याने स्मिथला बाद करत कांगारूला मोठा धक्का दिला. तिसर्‍या बळीसाठी मार्शने लबुशेनसोबत मार्शने 52 धावांची भागीदारी केली. जडेजाने त्याला 81 धावावर बाद केले. त्याने या दरम्यान 65 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकार मारले. शमीने तीन षटकांत तीन बळी घेतल्या. त्यानंतर जडेजाने मॅक्सवेलला झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. शेवटी सिराजने शॉन अ‍ॅबॉट आणि अ‍ॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांत गुंडाळला. शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन, तर जडेजाने दोन बळी घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक बळी टिपला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा