लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी अखेर लाहोर न्यायालयासमोर हजर झाले. 9 प्रकरणांत संरक्षणात्मक जामिन मंजूर करावा, यासाठी ते हजर झाले आहेत. दरम्यान ते हजर होण्यापूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट 18 मार्च पर्यंत रद्द केले. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधानपदावर असताना भेटवस्तू आणि घड्याळे वाढीव किंमतीत विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या माध्यमातून त्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता. त्यांच्या लाहोर येथील झामन पार्क निवासस्थानी त्यांना अटक करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे पथक गेले होते. परंतु न्यायालयाने कारवाई करु नका, असा आदेश दिला होता. तसेच न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. इस्लामाबाद न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले होते. तसेच याबाबत सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. त्यामुळे त्यांचा सत्र न्यायालयात हजर होण्याचा मार्ग मोकळा झाला.