न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धेचे अमृतमहोत्सवी वर्ष

पुणे : अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे वैयक्‍तिक प्रथम पारितोषिक नौरीत खोंडेकर हिने पटकाविले. तर युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद यांनी सांघिक प्रथम पारितोषिकावर नाव कोरले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, वक्‍तृत्वोत्तेजक सभा यांच्या वतीने 75 वी न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी झाला. वक्‍तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, वक्‍तृत्वोत्तेजक सभेच्या प्रमुख कार्यवाह व टिमविच्या प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होत्या.

सतीश देशपांडे, अंजली औरंगाबादकर-जोशी, सौरभ जाधव, उद्देश पवार, वेदांत कुलकर्णी व दीपक कर्वे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी डॉ. टिळक यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. न्यायमूर्ती रानडे आंतमहाविद्यालयीन स्पर्धेनेे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने दोन दिवसीय ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणच्या अनुषंगाने ‘भारताच्या विकासात मातृभाषेतील शिक्षण महत्वाचे पाऊल ठरेल’ या स्पर्धेच्या विषययाची निवड करण्यात आली होती. देशभरातून 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

दिल्‍ली, उत्तरप्रदेश येथील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी मराठी व इंग्रजीतून आपले विचार मांडले. दरम्यान वादस्पर्धेतील वैयक्‍तिक व्दितीय पारितोषिक मुग्धा थोरात व मैत्रेयी सुंकले यांनी मिळविले. तर तृतीय पारितोषिक झलक सचदेव व पुष्पक कवडे यांनी पटकविले. वैयक्‍तिक उत्तेजनार्थ परितोषिक वत्सल रोहिला, रामहरी जाधव, शिवम जाधव चिनाझा रिटा व निकिता चौरासिया या पाच जणांनी मिळविले.

डॉ. दीपक टिळक म्हणाले, न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धा यावर्षी अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. देशभरातून स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे कौशल्य निर्माण व्हावे, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होण्याकरीता स्पर्धा घेतली जाते. वक्‍तृत्वोत्तेजक सभा 150 वर्षे अविरतपणे सुरु आहे. इतर अनेक संस्थांनीदेखील शतकोत्तर वर्ष पूर्ण केले आहे. कायमच या संस्थांनी समाजाला मार्गदर्शन देण्याचे काम सुरु ठेवले आहे. वक्‍तृत्व ही कला अंगी असणारा समाजाला मार्गदर्शन करु शकतो. त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्रात तो पुढे तो जाऊ शकतो, त्यामुळे ही कला अंगीकृत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा, असेही यावेळी डॉ. टिळक म्हणाले. वक्‍तृत्व ही एक कला असून ती आत्मसात करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत, प्रयत्न करणे हे कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

नवीन शैक्षणिक धोरणात मराठी हा विषय आवश्यक आहे. मराठी भाषेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लवकर आत्मसात करता येतो, असेही डॉ. टिळक यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सहायक प्रा. अनुजा पालकर यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा