माडगूळकर, फडकेंचा उल्लेख न केल्यास कारवाई

पुणे : ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’चे स्वामित्व हक्क (कॉपी राईट) अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडे आहेत. त्यामुळे ‘गीतरामायण’ कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या संस्था आणि कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये, तसेच कार्यक्रम सादर होत असलेल्या व्यासपीठावरील फलकावर ग. दि. माडगूळकर विरचित ‘गीतरामायण’ असा उल्लेख ठळकपणाने करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

गीतरामायण हे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे. भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे कार्यक्रम होत असतात. गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ अशा विविध भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र, हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबूजी नावाचा उल्लेख न करण्याचा वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत. कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही. हे माडगूळकर कुटुंबीयांतर्फे खपवून घेतले जाणार नाही. गीतरामायण सादर होणार्‍या प्रत्येक जाहिरात फलकावर तसेच कार्यक्रमाच्या फलकावरही ‘महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख असायलाच हवा. तसेच, संगीत सुधीर फडके असा उल्लेख असणे आवश्यक आहे, अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.

गीतरामायणाचे स्वामित्व हक्क अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडेच आहेत. ते 2062 पर्यंत अबाधित राहणार आहेत. गदिमांना त्यांचे श्रेय योग्य रीतीने न दिल्यास माडगूळकर कुटुंबीयांतर्फे संबंधित कार्यक्रमावर स्वामित्व हक्क कायद्यामार्फत आक्षेप घेतला जाणार असल्याचे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा