केंद्राची भूमिका; लोकसभेत विविध मुद्दे सादर
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, या मताशी केंद्र सरकार सहमत आहे. त्यासाठी नवीन कल्पना शुक्रवारी मांडल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर निवडणुकीवर होणारा मोठा खर्च तसेच करदत्यांचे पैसे वाचणार आहेत. त्याचा विनियोग अन्य प्रकल्पांसाठी करता येणे शक्य होणार आहे. परंतु असा निर्णय घेण्यासाठी घटनात्मक बदल तसेच विरोधी पक्षांमध्ये एकमत घडवून आणण्याची कसरत केंद्राला करावी लागणार आहे.
केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत या संदर्भातील लेखी उत्तर संसदेत दिले. देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेण्यासाठी संसदीय समितीसमोर मुद्दा विचाराधीन आहे. निवडणूक आयोगासह संबंधितांची मते विचारात घेतली जातील. समितीने या संदर्भात काही शिफारसी केल्या आहेत. त्या कायदा आयोगासमोर तपासणीसाठी येणार आहेत. त्यानंतर एक मार्गदर्शक मार्ग तयार होईल. तसेच एकाच वेळी निवडणूक घेण्याची चौकट तयार करता येईल. अशा पद्धतीने निवडणूक घेतली तर करदात्यांचा पैसा वाचणार आहे. तसेच प्रशासनाला, कायदा आणि सुव्यवस्थेला या कामाला दोनदा जुंपण्याची पद्धत कालबाह्य ठरेल. तसेच उमेदवारांचा होणारा निवडणूक खर्च आणि वेळही वाचणार आहे. तसेच आचारसंहिता लागू झाल्याने लोककल्याणकारी योजनांना खिळ बसतो, असे रिजिजू म्हणाले.
परंतु अशा प्रकारे निवडणूक घेतल्यास घटनेतील पाच कलमांत बदल करावे लागतील. त्यामध्ये कलम 83 आणि 85 नुसार अनुक्रमे संसदेचा कालावधी, ती बरखास्त करणे यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विधानसभेसाठी कलम 172 आणि 174 चा मुद्दा आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे 356 कलम यामध्ये देखील बदल करावे लागतील. अर्थात एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत होणे आवश्यक आहे. परंतु एकदा निवडणुकीसंदर्भात ढाचा तयार झाला. राज्य सरकारमध्ये देखील एकमत झाल्यास अडचण येणार नाही.
एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात मतदान यंत्रे लागणार आहेत. त्याचा खर्च कोट्यवधी रुपयांत आहे. यंत्रे 15 वर्षे समर्थपणे कार्य करु शकतात. या कालावधीत ती तीन ते चार वेळाच वापरता येतात. त्यामुळे प्रत्येक पंधरा वर्षानंतर ती बदलावी लागणार आहेत. त्याशिवाय अतिरिक्त मतदान आणि सुरक्षा कर्मचारी लागणार आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिका, स्वीडन आणि ब्रिटनमध्ये एकाच वेळी निवडणूक घेतली जात असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.