पुणे : राज्यातील महिलांना आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोणत्याही बसमधून प्रवास करताना तिकिटात तब्बल 50 टक्के सवलत मिळणार आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत 50 टक्के सवलतीची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या लालपरी, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही, शिवाई आदी बसचा समावेश आहे. शहरी भागात शिवशाही, शिवनेरी आणि शिवाई बसला प्रवासी प्राधान्य देतात. ग्रामीण भागात लालपरी आणि हिरकणी बसची संख्या अधिक आहे. लालपरी आणि हिरकणीच्या तुलनेत शिवशाही, शिवनेरी, शिवाई बसचे तिकीट दर अधिक आहेत. मात्र, आता महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकिटात 50 टक्के सवलत देण्यात आली असल्याने निम्या तिकिटात कोणत्याही मार्गावर कोणत्याही प्रकारच्या बसने प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतींचे शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला देण्यात येते. राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.
एसटी प्रवासातील सवलतीबाबत राज्य सकारने घोषणा 9 मार्च रोजी केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश निघाला नव्हता. तो काल काढण्यात आला.