स्मरण तेजाचे
17-मार्च-1882 (शुक्रवार) – आजच्या दिवशी, ’केसरी’चे सह-संस्थापक आणि ’आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार, साहित्यिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
टिळक-आगरकरांनी सामान्य पदवीधराप्रमाणे सरकारी नोकरीचा किंवा वकिलीचा रुळलेला मार्ग सोडून स्वतंत्ररीत्या चरितार्थ चालवून आपले तन आणि मन लोकशिक्षणाच्या कार्याला वाहून घेण्याचे ठरवले, त्याच सुमारासच सुप्रसिद्ध निबंधमालाकार विष्णू उर्फ धाकटे चिपळूणकर हे सरकारी नोकरीचा पाश तोडून स्वतंत्र इंग्रजी शाळा काढण्याचा विचार करत होते. चिपळूणकर हे युनिव्हर्सिटीच्या स्थापना झाल्या नंतरच्या पहिल्या दहा वर्षात जी महाराष्ट्रीय विद्वरत्ने तीतून पदव्या घेऊन बाहेर पडली, त्यातील एक अग्रेसर गृहस्थ होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही अव्वल इंग्रजीतील एक पंडित असून सरकारी शिक्षणखात्यात नोकर होते. विष्णुशास्त्र्यांना मराठी लेखनाचा नाद पहिल्यापासूनच होता, व त्यांची भाषा फार ठसकेदार व प्रतिपक्षाला वर्मी घाव घालणारी असल्यामुळे इंग्रजीतील मेकॉलेच्या निबंधाप्रमाणे त्यांचे शालापत्रकातील व पुढे निबंधमालेतील विविध विषयांवरचे निबंध माहितीने भरलेले व प्रसंगी मुद्याला सोडून जाणारे असले तर भाषासौंदर्याच्या दृष्टीने फार आकर्षक व तरुणपिढीला स्पुर्ती देणारे असत. विष्णुशास्त्री, टिळकांपेक्षा सहा वर्षांनी वडील होते. बी.ए. पास झाल्यावर त्यांनी शाळाखात्यात नोकरी पत्करली होती, आणि नोकरीवर असतानाच 1874 मध्ये त्यांनी निबंधमाला मासिक पुस्तक सुरु करून शाळेच्या बाहेरच्या सामान्य जनतेला सुशिक्षित व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न चालवला होता. पुढे 1878 मध्ये शास्त्रीबुवांची पुण्याहून रत्नागिरीला बदली झाली, तेव्हा निबंधमालेचे काम चालवणे त्यांना जड जाऊ लागले होते, आणि त्या मालेतून प्रगत होणारे त्यांचे विचार सरकारी अधिकार्यांना आवडणारे नसल्यामुळे शास्त्रीबुवांनीही आपली रुपेरी बेदी तोडून स्वतंत्र वातावरणात वावरता येईल, असा व्यवसाय पाहण्याचा विचार चालवला होता. यावेळी ते आपण एखादी स्वतंत्र शाळा काढून ती स्वतंत्रपणे चालवून दाखवू अशा उमेदीत होते. टिळक-आगरकर, शास्त्रीबुवांना शाळेसाठी येऊन मिळाले. सोबत बाळाजी आबाजी भागवत व व्यंकटेश बाळाजी करंदीकर असे आणखीही दोन तरुण या शुभसंकल्पात सामील झाले. या सर्व मंडळींचा उत्साह पाहून शास्त्रीबुवांनी 1880च्या सुरवातीला ही शाळा उडवायची असे ठरविले व आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी सरकारी नोकरी सोडली, हे त्यांचे स्वार्थत्यागाचे एक उदाहरण, तर दुसरे उदाहरण शाळेच्या पहिल्या वर्षी त्यांनी पगार घेतला नाही असे सांगितले जाते. शाळेखेरीज न्यू किताबखाना व चित्रशाळा हे त्यांचे चालू संदर्भात स्मरणीय उद्योग आहेत. दिनांक 14 मार्च 1882 रोजी ’देशोन्नत्ती’ नामक लेखामध्ये चिपळूणकरांनी ’मुद्रणस्वातंत्र्याबद्दल’ अधिक विस्ताराने व सावेश वक्तृत्वाने स्पष्ट मांडले आहे.