लोणावळा (वार्ताहर) : अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने लोणावळेकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वार्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छपराचा आसरा घेतला.
लोणावळा शहर आणि परिसरात काल गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि जोरदार वार्यासोबत पाऊस कोसळू लागला.
सुमारे अर्धा तास सलग बरसणार्या या पावसामुळे बाजारहाट किंवा अन्य कारणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच कामावरून घरी परतणार्या कामगार वर्गाची चांगलीच फजिती झाली. रस्त्यावर पथारी टाकून बसलेल्या पथारीवाल्यांना, तसेच हातगाडीवर व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना आपल्या पथार्या, हातगाड्या जागेवर सोडून मिळेल त्या छपराच्या ओसरीला धाव घ्यावी लागली. शहरातील अनेक रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते.