बंडगार्डन : शंभर वर्षापूर्वी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथातील अक्षरे जरी जुनी झाली असतील; मात्र पुस्तकातला सिध्दांत अतिशय ताजा आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात डॉक्टरेट मिळवताना सादर केलेल्या प्रॉब्लेम ऑफ रूपी इटस ओरिजन अ‍ॅन्ड सोल्युशन हा ग्रंथ (प्रबंध) 1923 साली सादर केला होता. या वर्षी त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले. तेव्हा मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर बोलत होते. रूपयाची समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.कैलास ठावरे, किसन इंगोले यांनीही या दरम्यान मार्गदर्शन केले. अर्थव्यवस्थेवर काम करणार्‍या प्रत्येक कर्मचारी नागरिकांनी फिलॉसॉफिकल असायला पाहिजे, असे बाबासोहब आंबेडकर म्हणायचे. त्याची जाणीव आज भारतातील अर्थव्यवस्थेची अवस्था पाहून प्रकर्षाने होत आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी वेध घ्यायला हवा. आजच्या महागाईचे मुख्य कारण म्हणजे आपण लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, हेच आहे. भारताची आंतरराष्ट्रीय व्यापार नितीही चुकीची आहे. भारत मालाची निर्यात करण्यास कमी पडत आहे केवळ माल आयात करण्यावर भर देत आहे. या सर्व अर्थविषयक धोरणावर आपली मते व उपाययोजना बाबासाहेबांनी शंभर वर्षापूर्वी प्रॉब्लेम ऑफ रूपी या ग्रंथात करून ठेवल्या आहेत. ज्याचे आज जग अनुकरण करतेय आणि भारत मात्र त्यात अपयशी ठरत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.यावेळी सूत्रसंचालन प्रियदर्शिनी तेलंग यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा