पिंपरी : हास्यजत्रेने मला घडवले. मात्र फुलराणीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली हे भाग्य समजते. नवरसातले जवळजवळ सगळे रस मला या चित्रपटात करता आले. कथा ओरिएंटेड सिनेमे लोकांना आवडतात. फुलराणी चित्रपट हाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला
सध्या मराठी चित्रपटसृष्टी कात टाकत आहे. नवनवीन विषय चित्रपटातून हाताळले जात आहेत. विश्वास जोशी दिग्दर्शित व निर्मित फुलराणी हा चित्रपट येत्या गुढीपाडव्याला प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर व मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे.
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने फुलराणीच्या प्रमोशननिमित्त चिंचवड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रियदर्शनीने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक विश्वास जोशी हेही उपस्थित होते.
सुबोध भावेबरोबर काम करताना सुरुवातीला दडपण होते. त्याच्याबरोबर प्रेमाचा सीन करणे अवघड वाटायचे. कारण तो सीनियर आहेत. मात्र मी कलाकार तोही कलाकार हे मनात आणले आणि भूमिका वठवली. सुबोध भावे हा रिऍक्ट होणारा ऍक्टर आहे. तो सीनमध्ये खेळतो. टेक्निकली साऊंड आहे, असे प्रियदर्शनी म्हणाली.
हास्यजत्रेत मला ओळख मिळाली, पण टॅलेंटच्या जीवावर मला फुलराणीमध्ये भूमिका मिळाली. हे एक वळण आहे. हे वळण मला कुठे मिळेल सांगता येत नाही. मात्र घडण्याच्या काळात मलाही संधी मिळाली याचा आनंद आहे, असे प्रियदर्शनीने सांगितले.
चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणाले की, मी 1982-83 मध्ये भक्ती बर्वे यांची भूमिका असलेले ती फुलराणी हे नाटक पाहिले. 2019 मध्ये मी आधीचा चित्रपट पूर्ण केला. तेव्हापासून फुलराणीची थीम घेऊन नवीन काही करता येईल का याबाबत डोक्यात विचार चालू होता. त्यातूनच फुलराणी हा चित्रपट साकारला.
ऑस्करबाबत विचारले असता निर्माते दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणाले की, त्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. मार्केटिंग स्टॅटेजी स्क्रीनिंग प्रमोशन यादृष्टीने मराठी चित्रपट तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
यावेळी दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, संचालक एड. अविनाश ववले, विजय कांबळे, निवेदक अक्षय मोरे आदी उपस्थित होते. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले.