श्रीनगर : श्रीनगर ते लेह दरम्यान असलेला 434 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग अखेर दोन महिन्यांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे मागील 68 दिवसांपासून हा महामार्ग बंद होता. प्रशासनाकडून अगोदर चाचणी घेण्यात आली आणि नंतर हा महामार्ग खुला करण्याची घोषणा करण्यात आली.

झोझिला पास येथून हा महामार्ग दळणवळणासाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती सीमा रस्ते संघटनेचे अधिकारी राजीव चौधरी यांनी दिली. झोझिला येथून लेहकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि लष्करासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मागील काही वर्षांपासून हा महामार्ग बर्फ पडण्याच्या कालावधीत सहा महिने बंद ठेवण्यात येतो. या वर्षी मात्र प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे केवळ 68 दिवसांत हा महामार्ग खुला करण्यात आला.

लडाखमधील लोक हा महामार्ग खुला होण्याची वाट पाहत असतात. दर वर्षी हा महामार्ग सहा महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येतो. या वर्षी मात्र हा महामार्ग अवघ्या 68 दिवसांत खुला करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचणी येणार नाहीत, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

लडाखमध्ये लष्कर तैनात असताना महामार्ग बंद असल्यामुळे हवाई मार्गाने सैन्यासाठी मदत पाठवावी लागते. त्यासाठी सुमारे 7 कोटी रूपये रोज एवढा खर्च येतो, या हिशोबाने सहा महिन्यांसाठी जवळपास 400 ते 450 कोटी रूपये खर्च होतात. मात्र महामार्ग खुला केल्याने सरकारचे यात खर्च होणारे पैसे वाचणार आहेत.

जानेवारी 6 पर्यंत महामार्ग दळणवळणासाठी खुला होता, मात्र बर्फ पडू लागल्याने तो बंद करण्यात आला. लष्कराचे सर्व साहित्य या मार्गाने घेऊन जाता येणार आहे. लेह आणि श्रीनगर दरम्यानचा हा लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. महामार्ग खुला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे स्थानिक रहिवासी बकर अली म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा