पुणे : उन्हाळी सुट्या लागण्याआधीच अनेक जण पर्यटनाला अथवा फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे सुट्टीच्या काळात प्रवासी संख्येत वाढ होते. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेवून पुणे विमानतळावरून विमानांच्या उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत 100 हून अधिक विमानांचे उड्डाण होणार आहे.
विमान प्रवासी संख्यादेखील चाळीस हजारांच्या घरात पोचेल असा अंदाज आहे. या शेड्यूलमध्ये केवळ उड्डाणांची संख्या वाढविण्यात आली असे नाही, तर नव्या शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर दिला आहे. यावर्षी विमानांची वाहतूक 200 हून अधिक असणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशातील प्रमुख विमानतळांचे समर शेड्यूल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होते. कोची, नाशिकसह अन्य विमानतळांनी ते जाहीर केले आहे. पुणे विमानतळाचे समर शेड्यूल 26 मार्च ते 28 ऑक्टोबरदरम्यान असण्याची शक्यता आहे. पुण्याहून वाराणसी येथे पहिल्यांदाच विमानसेवा सुरू होत आहे. तसेच अन्य शहरांचाही यामध्ये समावेश आहे.
गेल्या आठ वर्षांपासून पुणे-मुंबई विमानसेवा बंद आहे. ती सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एअर इंडियाने विंटर शेड्यूलमध्ये सकाळचा स्लॉट दिला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने 15 दिवसांनी विमानतळ प्रशासनाने तो स्लॉट रद्द केला. यंदाच्या समर शेड्यूलमध्येही पुणे-मुंबईसाठी स्लॉट दिला जाण्याची शक्यता अधिक आहे. विमान कंपनीने त्यास चांगला प्रतिसाद दिला तर आठ वर्षांपासून बंद झालेली विमानसेवा पुन्हा सुरू होऊ शकते. विमानसेवा सुरू झाल्यावर पुणे-मुंबई प्रवासास अवघे 25 मिनीट लागतील.