शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली
लोकमान्य टिळक ही विभूती इतकी अनेकांगी आहे की कोणाही एक माणसाला तिच्या सर्वांगीण चारित्र्याचे आकलन करता येणार नाही. लोकमान्य टिळकांनी अमलात आणलेली प्रत्येक कृती देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी पोषक ठरली व स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला. मुळात त्यांचे व्यक्तिमत्व समाजशील असल्यामुळे त्यांची थोरवी व लोकप्रियता त्यात सहजपणे मिसळून गेली. अस्पृश्यता, लिगभेद, स्त्रीशिक्षण, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय यांना दूर लोटण्याची ईर्षा व प्रतिज्ञा त्यांच्यात होती.
स्त्री शिक्षणाविषयी त्यांचे मत उदारच होते. त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले होते आणि ’कोणत्याही सुशिक्षित स्त्रीचा कल समाज सांभाळून घेऊन सुधारणेकडे दिसला, किंवा तिला राष्ट्रीय राजकारणाची किंचित आवड आहे असे दिसले’ तर ते लेखाने किंवा सभांतून तिचा गौरव करून उत्तेजन देण्यास मागे पुढे पाहत नसत. परंतु, सुशिक्षित स्त्रियांचा विनय सुटला किंवा त्यांचे बोलणेचालणे अथवा त्यांचा बोलबाला प्रमाणाबाहेर जातो असे दिसले तर त्यांना खपत नसे. बाईंच्याभोवती सुधारकांचा वेढा पडलेला पाहून बाईंच्या हातून खरे समाजोपयोगी असे काम कोणतेही होणार नाही, असेच त्यांच्या मनाने घेतले असेल, यात शंका नाही.
1887 मध्ये लोकमान्य टिळकांनी ’फेमल हायस्कूलातील शिक्षणक्रम’ या विषयावर केसरीत चार लेखांची एक लेखमाला लिहिली. या लेखमालेवरील आगरकरांची टीकाही पुढे केसरीतच प्रसिद्ध झाली. पुढे लवकरच इंग्लंडच्या एका मासिकात टिळकांच्या मताशी जुळणारा एक लेख इंग्रज बाईंनी लिहिलेला त्यांच्या वाचनात येताच त्यांनी त्यातील विचार ’केसरी’च्याद्वारे स्वजनांस सादर केले. 1891च्या अखेरीस स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि त्यासाठी भारतीय महिला विद्यापीठ स्थापन करणारे भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांची लोकमान्यांबरोबर पहिली भेट झाली. पुढे 1893 मध्ये कर्व्यांचा पुनर्विवाह झाला. त्यावेळी लोकमान्यांना आमंत्रण होते व ते पानसुपारीला उपस्थित होते.
पुनर्विवाहाच्या प्रश्नासंबंधाने सुशिक्षित लोकांची मत घेण्याचा कर्वे यांनी प्रयत्न केला, त्यावेळी लोकमान्यांनी पुनर्विवाहितेबरोबर पतीव्यवहार करण्यास हरकत नाही, असे स्पष्ट लेखी अभिप्राय दिला होता. श्रीमती पार्वतीबाई आठवले यांच्या विनंतीला मान देऊन टिळकांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेला भेट दिली आणि आश्रमाच्या शेरेबुकावर संस्थेविषयी ’बरा’ अभिप्राय लिहून ठेवला. आश्रम चांगल्या रीतीने चालू लागल्यावर लोकमान्यांनी आश्रमाच्या माहितीबद्दल एक मोठा लेख ’केसरी’मध्ये प्रसिद्ध केला. आश्रमाला लोकमान्यांकडून प्रत्यक्ष मदत फारशी झाली नसली तरी त्यांच्याकडून झालेल्या अप्रत्यक्ष मदतीची किंमत करता येणार नाही. 1895-96च्या काळात स्त्री शिक्षणसंबंधाने आणि विशेषतः विधवांच्या शिक्षणासंबंधाने लोकांमध्ये अनुदार बुद्धी फार असताना आश्रमसंबंधाने सामान्यतः ’केसरी’ने थोडीशीही वक्रदृष्टी दाखवली नाही हे विशेष.
1899 मध्ये सिलोन आणि ब्रह्मदेश या देशात आयुष्यातील स्वतंत्र प्रवास असे दोनच त्यांनी केले. छत्रे यांच्या सर्कशीबरोबर ते तीन आठवडे ब्रह्मदेशात गेले रंगूनला काही दिवस राहून ते मंडालेस जाऊन आले. ब्राह्मी लोकांच्या चालीरीतींच्या
निरीक्षणाने ’सामाजिक सुधारणा’ व ’राष्ट्रीय उन्नती’ यांच्यात मुळीच कार्यकारण संबंध नाही हा आपला प्रिय सिद्धांत त्यांनी 1900 मध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये मांडला. संपूर्ण स्त्री स्वातंत्र्य, जातिभेदाचा अभाव इत्यादी सर्व सुधारणा ब्रह्मदेशात, जेथे इंग्रजांचे राज्य होण्यापूर्वीपासून अस्तित्त्वात असूनही तेथील प्रजा सांप्रत इंग्रजांच्या दास्यात आहे, त्यावरून ’राजकारण’ आणि ’सामाजिक सुधारणा’ यांचे आपसात उपकारक असे मुळीच नाते नाही हेच सिद्ध होते असे त्यांनी प्रतिपादन केले.
1900 मध्ये प्लेगमध्ये नागरिकांच्या अडचणी संदर्भातील सभेत नायकिणींची उपस्थिती जेव्हा अनेकांना खटकली, तेव्हा टिळकांनी मात्र नागरी सभेचे तत्व सांगून ठामपणे त्या स्त्रियांची बाजू घेतली.
स्वदेशी चळवळीत सर्वजण आपापल्या परीने चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील होते. या चळवळीत अर्थातच तरुण मंडळी आघाडीवर होती. इतके दिवस घरच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त असलेल्या स्त्रियाही, विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रिया अग्रेसर होत्या. लोकमान्य टिळकांच्या घरी झालेल्या स्त्रियांच्या एका बैठकीमध्ये टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई देखील सहभागी झाल्या होत्या. सत्यभामाबाईंनी त्यांच्या कौटुंबिक कामाव्यतिरिक्त बाहेरच्या एखाद्या कार्यात सहभाग घेतल्याचा बहुदा एकमेव दाखला म्हणून या स्वदेशी संबंधाच्या बैठकीचा उल्लेख करता येईल.
दादासाहेब खापर्डे यांच्या ’खापर्डेचरित्र’मध्ये त्यांचे चिरंजीव बाबासाहेब खापर्डे लिहितात – ’चायना बागेत एक खास बायकांची सभा झाली. तिथे पुरुषांना बंदी होती. लोकमान्यांच्या सन्मानार्थ सभा म्हणून त्यांना प्रवेश मिळाला. मी (बाबासाहेब) त्यांच्या अंगरख्याचा पदर धरून आत शिरलो. असे दृश्य पूर्वी जन्मात दिसले नाही व पुन्हा दिसण्याची आशा नाही. एवढी विस्तृत जागा पण बायकांनी गच्च भरली होती. लोकमान्यांना कुंकुमतिलक लावले व त्यांची आरती केली, तेव्हा ताम्हनातील निरांजनाच्या ज्योतीच्या प्रकाशात दिसणारा लोकमान्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. लोकमान्य बोलायला उठले तेव्हा कोणाकडे पाहून बोलतात इकडे माझे लक्ष होते. मधूनमधून ते सगळीकडे दृष्टी फिरवीत, मधूनमधून समोर बघत आणि केव्हा केव्हा ते टेबलाकडे पाहत बोलत’.
1917 मध्ये लोकमान्य टिळक कलकत्ता काँग्रेससाठी जाणार होते. त्यावेळी मुंबईच्या एका शिक्षिका आणि विख्यात सामाजिक कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे छोटे चरित्र मराठीत लिहिले आणि टिळकांनी विनंती केली की ’आपण या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी असे मला वाटते’. टिळक ताबडतोब म्हणाले – ’का नाही’. 1918 मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या गांधी चरित्राला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली व त्यात महात्मा गांधींचा यथोचित गौरव केला आहे.
सोमवार दिनांक, 17 मार्च 1919 रोजी मुंबईत लोकमान्य टिळकांचे अवंतिकाबाई गोखले यांच्या हिंद महिला समाजापुढे ’स्त्रिया आणि राष्ट्रकार्य’ या विषयावर भाषण झाले. भाषणात ते म्हणाले – ’स्त्रिया राष्ट्राच्या ’शिक्षक’ असून त्या ’रक्षक’ही आहेत, पूर्वी भारतीय स्त्रिया महान देशभक्त असल्याने आजपर्यंत हिंदुस्तानचे अस्तित्व टिकले आहे’. लोकमान्य, स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते असा काही लोकांचा गैरसमज होऊन तसा अप्रचार झाला आहे. तो दूर करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्याच शब्दांत अवंतिकाबाई गोखले यांनी पुढील लेख लिहिला आहे.
त्या म्हणतात – ’लोकमान्य टिळकांच्या भाषणाचा विषय ’स्त्रिया आणि राष्ट्रकार्य’ हा होता आणि तो त्यांनी फारच चांगल्या तर्हेने व सोप्या भाषेत स्त्रियांच्या समाजाला समजावून सांगितला होता. त्यांनी आपल्या भाषणात मुख्य तीन मुद्दे मांडले, ते असे –
पहिला मुद्दा – स्त्रियांची राष्ट्रकार्याविषयी पहिली कामगिरी म्हणजे महान देशभक्त राष्ट्रीय पुरुषांचे ’जनक’ हे होय. पुरुष उत्पन्न करणे हे होय आणि अशा तर्हेने स्त्रियांनी आपल्या घरची जबाबदारी ओळखून राष्ट्रकार्य केल्यास देशाची उन्नती फार लवकर होणार आहे. कारण आपल्यामध्ये म्हणच आहे की – ’खाण तशी माती’.
दुसर्या मुद्दा – स्त्रिया या राष्ट्राच्या शिक्षक होत. लहानपणी मुले, विशेषतः स्त्रियांच्या सहवासात जास्त असतात आणि म्हणूनच त्यावेळी मुलांना ज्याप्रमाणे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे ती पुढे होतात. यावेळचे शिक्षण केवळ पुस्तकी नव्हे, परंतु ज्या शिक्षणाच्या योगाने मुलांचे शील उत्तम बनेल आणि ती स्वार्थत्यागी, दीर्घउद्योगी व आपल्या देशाकरिता निरपेक्ष बुद्धीने काम करणारी निपजत अशा तर्हेच्या भावना त्याच्यामध्ये उत्पन्न करणे, हे मातेचे मुख्य कर्तव्य होय. लोकमान्य टिळकांनी आपल्या भाषणात वेदकालीन स्त्रिया आपल्या मुलांना काव्यांचे शिक्षण देत असत, इतकेच नव्हे तर सुमारे 40 वर्षांपूर्वी स्त्रिया संस्कृत भाषेत चांगल्याच प्रवीण होत्या, आणि त्या संस्कृत भाषेत आपल्या घरात अस्खलित तर्हेने बोलत असल्याचे आपण पहिले होते, असे त्यांनी सांगितले. त्या गोष्टीवरून स्त्रियांचा त्यावेळेस शिक्षणाच्या बाबतीत आणि इतर ज्ञानातही दर्जा फार मोठा होता असे दिसून येते.
तिसरा मुद्दा – स्त्रिया या राष्ट्राच्या रक्षक होत. इतिहासावरून आपल्याला कळून येईल की, राष्ट्रावर आलेली संकटे स्त्रियांनी केव्हा आपल्या शौर्याने, तर केव्हा आपले देह अग्निकुंडात अर्पण करून निवारण केले आहेत. पूर्वी स्त्रिया महान देशभक्त असल्यामुळेच आजपर्यंत हिंदुस्थान देश जिवंत राहू शकला.
’लोकमान्य टिळकांना स्त्रियांविषयी फार आदर होता आणि देशाची पूर्ण उन्नती होण्याकरिता स्त्रियांच्या मदतीची राष्ट्राला फार जरूर आहे, असे ते म्हणत असत. आमच्या समाजामध्ये भाषण करण्याविषयी मी त्यांना विनंती केली होती, त्यावेळी ते अतिशय कामामध्ये होते. तरी त्यांनी मुंबईला खास आमच्याकरिता येऊन आम्हाला बोधामृत पाजले’. लोकमान्य टिळकांचे खास स्त्रीवर्गापुढे हे पहिलेच आणि शेवटचे भाषण ठरले.
त्यांच्या हयातीत स्त्रियादेखील सार्वजनिक जीवनामध्ये मोठ्या संख्येने वावरत नव्हत्या. ज्या होत्या त्यांची नावे गोळा केल्यास ती हाताच्या बोटांइतकीच जेमतेम भरतील. एकाने आपल्या आठवणीत सांगितले आहे की, इंग्लंड दौर्याहून आल्यावर स्त्रियांसंदर्भातील त्यांच्या वागणुकीतही लक्षणीय फरक पडल्याचे लोकांच्या निर्दशनास आले. आधी टिळक, स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत भिडस्त होते आणि ते स्त्रियांशी फारसे बोलतच नसत; पण इंग्लंडहून परतल्यावर ते बरेच मोकळे झाले. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा स्त्रियांशी करावी लागली होती. चिरोल खटल्याच्या प्रसंगी इंग्लंडमध्ये असताना, वेदांसंबंधाच्या संशोधनात ते गर्क झालेले असायचे आणि त्यासाठी तासनतास इंडिया ऑफिसच्या ग्रंथालयात जाऊन बसत असत. खाल्डियन आणि असिरियन सभ्यतांवर प्रकाश टाकणार्या प्राचीन विटांवरील कोरीव लेखांचे शब्दांकन करण्यासाठी त्यांनी एका महिलेला मानधन देऊन नेमले होते. इंग्लंडमध्येच राजकीय कार्यात व्यग्र असताना देखील लोकमान्य टिळकांनी एलिझाबेथ अरनॉल्ड या महिलेला संस्कृतचे धडेही दिले होते.
गीतेतील अकराव्या अध्यात, प्रिय: प्रियायाहसि देव सोढु (श्लोक क्रमांक 44) असे एक चरण असून तो स्त्रीविषयक रसिकतेला जागृत करणारा आहे. ग्रंथातील शृंगारपर शब्दसुद्धा ज्यांच्या वृत्तीला खपला नाही ते टिळक प्रत्यक्ष व्यवहारामध्ये स्त्रियांच्या बाबतीत किती खबरदारीच्या वागत असतील हे कोणाच्याही लक्षात येईल. लोकमान्य टिळकांना विधवांचा विवाह जसा ’शास्त्रदृष्ट्या’ अमान्य होता तसाच विधुरांचा विवाह देखील नापसंत होता. संमतवयाच्या वादात स्वतः टिळकांनी एका सभेनिमित्त मांडलेल्या सूचनापत्रात, चाळीस वर्षापुढे पुरुषांचे लग्न होऊ नये किंवा या वयाच्या एखाद्या विधुराला जर लग्न करायचे असेल तर त्याने विधवेशी लग्न करावे याप्रमाणे दोन सूचना दिल्या होत्या. शेवटी विधवेने वपन करू नये, अशीही सूचना होती. समाजजागृती, सत्याचार, सर्वसमावेशकता आणि सडेतोडपणा ही सामाजिक चतुःसूत्री लोकमान्य टिळकांनी कायम ठेवली. लोकमान्यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानसंचिताचा अभ्यासपूर्ण आकलन केले होते. त्यामुळे परंपरेचा आंधळेपणा, कर्मठ अभिमान त्यांच्या ठायी नव्हता. त्यांना परंपरा सांभाळत आधुनिकतेचा विकास व्हावा असे वाटत असे. कालचक्राची गती व दिशा ओळखून लोकमान्यांनी त्यांच्या काळात हिंदुस्तानच्या राजकारणाची नौका कौशल्याने हाकली. लोकमान्य टिळकांचे दूरदर्शित्व सामान्य माणसालाही आयुष्याच्या रोजच्या पण महत्वाच्या व्यवहारात दाखवता येईल.