8 लाख 25 हजारांची दागिने लंपास

सातारा, (प्रतिनिधी) : शहरातील विसावा नाका येथील डॉ. सुषमा विलास माने यांच्या ग्रीन व्हिला बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी बुधवारी 8 लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

सातारा-कोरेगाव रस्त्यावर विसावा नाका येथे डॉ. सुषमा विलास माने यांचा ग्रीन व्हिला बंगला आहे. भर रस्त्यालगत हा बंगला असूनही सायंकाळी सात ते दहाच्या दरम्यान चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यांनी तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. रात्री दहानंतर डॉ. सुषमा माने या घरी आल्यानंतर त्यांना बंगल्याचे लॉक तोडल्याचे दिसून आले. घरामध्ये गेल्यावर लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांचे बॉक्स बेड व इतरत्र अस्तव्यस्त पडलेले दिसून आल्यावर त्यांनी खात्री केली असता अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला. सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुधीर मोरे करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा