पिंपरी : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका -नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी कर्मचार्यांच्या महत्वपुर्ण प्रश्नांबाबत पुकारलेल्या बेमुदत संपास गेली 2 दिवसांपासून उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. मात्र राज्यातील महापालिका अत्यावश्यक सेवेशी संबंधित सेवा देत असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आजपासून महापालिका कर्मचारी महासंघाने काळ्याफिती लावून काम करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.
या संदर्भात झिंजुर्डे म्हणाले की, दिनांक 15 मार्च, रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य महानगरपालिका -नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनच्या पदाधिकार्यांसोबत संपाबाबत चर्चा झाली.
दिनांक 16 मार्चपासून महानगरपालिकेतील सर्व कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर रुजु होवून काळ्या फिती लावून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपास पाठींबा देण्याचे ठरले. सर्व कर्मचार्यांनी थंब इम्प्रशन व हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने केले होते. त्यानुसार कर्मचारी आज काळ्याफिती लावून कामावर उपस्थित झाले.मात्र या संपातून आम्ही बाहेर पडलेलो नाही, असेही झिंजुर्डे यांनी सांगितले.