इटलीजवळील बोट दुर्घटनेत मृत्यू
क्वेट्टा : इटली जवळच्या समुद्रात महिन्यापूर्वी स्थांलतरीत होणार्या प्रवाशांची एक बोट बुडाली होती. या दुर्घटनेत पाकिस्तानी हॉकीपटू शाहिदा रझा यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुर्कस्तानातील इझमीर बंदरावरून ही बोट इटलीकडे जात होती. त्यात अफगाणि, पाकिस्तानी, इराण आणि अन्य देशांतील नागरिकांचा सामावेश होता. चांगले जीवनमान जगण्यासाठी ही मंडळी युरोपकडे जात होती. इटली जवळच्या समुद्रात त्यांची बोट बुडाली होती. सुमारे 170 जण प्रवास करत होते. त्यापैकी 66 जणांचा मृत्यू झाला. त्यात पाकिस्तानी हॉकीपटू शाहिदा यांचाही समावेश होता.
शाहिदा यांच्या पार्थिवावर बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने त्यांचा मृतदेह इटलीतून आणला गेला होता. शाहिदा यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, चांगले जीवन जगता यावे, यासाठी त्या तुर्कस्तानातून युरोपकडे जात होत्या. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याच्या उपचारावर खर्च करता यावा, यासाठी त्या नोकरी मिळवण्यासाठी युरोपकडे जात होत्या. दरम्यान, त्यांनी त्यांच्या मुलाला पाकिस्तानात ठेवले होते. आर्थिक संकटात सापडल्यामुळे शाहीदा यांनी पाकिस्तान सोडले होते, अशी माहिती त्यांची बहिण सादीया यांनी दिली. मुलावर उपचार व्हावेत आणि तो चांगले आयुष्य जगावा, यासाठी त्यांनी केलेली खटपट व्यर्थ झाल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, शाहिदा यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रध्वजात त्यांचे पार्थिव गुंडळल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर फिरत होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांना आणि चाहत्यांना मिळाली. तेथील दूरचित्रवाहिनीवर याबाबत कोणतेही वृत्त प्रसारीत झालेले नव्हते.