इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक टाळण्यासाठी न्यायालयाने एक अट ठेवली आहे. तोशाखाना खटल्याच्या सुनावणीदरम्यान, अतिरिक्त जिल्हा, सत्र न्यायालयाच्या (एडीएसजे) न्यायाधीशांनी सांगितले की, जर इम्रान खानने न्यायालयात आत्मसमर्पण केले तर ते त्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येणार नाहीत.
न्यायाधीश जफर इक्बाल यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या (ईसीपी) अर्जावर सुनावणी करताना ही माहिती दिली. तोशाखाना प्रकरणी इम्रान खानवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अजामीनपात्र वॉरंट जारी
सत्र न्यायालय 28 फेब्रुवारी रोजी इम्रान खानवर अभियोग लावण्याच्या तयारीत होते, परंतु माजी पंतप्रधानांच्या वकिलाने न्यायाधीशांना विनंती करत, त्यांना सुनावणीतून सूट द्यावी कारण त्यांना इतर अनेक न्यायालयात हजर राहायचे आहे असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करत, पोलिसांना त्यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
गदारोळ
पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना इम्रान खान यांना अटक करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले. इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा दल आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. यावेळी दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा करण्यात आला. या चकमकीत 65 पोलिसांसह सुमारे 100 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अटकेच्या नावाखाली आपले अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
पीटीआयच्या रॅलीवर बंदी
इक्बाल पार्क येथे रविवारी होणार्या पीटीआयच्या रॅलीवर लाहोर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. नागरिकांना त्यांचे सामान्य जीवन जगू द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पीटीआयकडून 19 मार्च रोजी लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान येथे एका रॅली आयोजन करण्यात येणार होते. आणि या रॅलीचे नेतृत्व इम्रान खान करणार होते.