शेततळी शेतीसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात भरपूर पाऊस पडतो; पण त्यानंतर काही दिवसातच पाण्याची टंचाई भासू लागते. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत निर्माण होते, मग शेतीसाठी कुठून पाणी आणणार? यावर शेततळी हा उत्तम उपाय आहे. ही तळी पावसाळ्याच्या दिवसात शेतात तयार करतात व जेव्हा हिवाळा किंवा उन्हाळा असेल, त्यावेळी या शेततळ्याचा उपयोग चांगला होतो. या शेततळ्याचा आणखी एक उपयोग म्हणजे जवळपासच्या अनेक विहिरींना पाणी वाढते, त्याचाही शेतीला चांगला उपयोग होतो. शेततळ्यासाठी सुद्धा अनेक शेतकर्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी त्यांच्या शेतात बांधलेल्या शेततळ्याची हकिकत वाचण्यात आली. त्यांनी आपल्या शेतात तब्बल 52 फूट खोलीचे शेततळे तयार केले आहे. गेल्या वर्षी या तळ्यात दोन कोटी लिटर पाणी साठले होते. त्यासाठी त्यांना सुमारे 22 लाख रुपये खर्च आला. हे पाणी शेतीला देण्यासाठी त्यांना विजेची गरज भासणार नाही, तसेच भूमिगत पाण्याची पातळीसुद्धा वाढेल. या शेततळ्यामुळे सुरडकर यांच्या 21 एकर शेताला पाणी तर मिळेल, या शिवाय इतर शेतकर्यांच्या शेतीलाही ओलावा मिळून शेत जोमदार येईल. सरकारने कमी खर्चात ही शेततळी कशी बांधता येतील याचे तंत्रज्ञान शेतकर्यांना देणे आवश्यक वाटते.