आता प्रतीक्षा निकालाची

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या संपूर्ण सुनावणीनंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला असून, 15 मेपूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश होता. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 15 मे पूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे.

गेल्या 14 फेब्रुवारीपासून 12 दिवस सलग सुनावणी पार पडली. या काळात 48 तास कामकाज चालले. पहिले 3 दिवस हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर मागील 9 दिवसांपासून दोन्ही गटाकडून जोरदार युक्‍तिवाद झाला. 9 महिन्यानंतर सुनावणी सुरू झाली होती.

ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत; शिंदे गटाकडून नीरज किशन गौल, हरीश साळवे, महेश जेठमलानी, तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. राज्यपालांच्या मर्यादा, विधानसभा अध्यक्षांचे अधिकारक्षेत्र, परिशिष्ट 10 लागू होतो की नाही, अशा आदी मुद्द्यांवर जोरदार युक्‍तिवाद झाला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून मोठा गट बाहेर पडत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढे गेले. आयोगाने आपला निर्णय दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा