मुंबई, (प्रतिनिधी) : किसान सभा व डाव्या पक्षांनी काढलेल्या शेतकरी मोर्चावर तोडगा काढण्यात सरकारला यश आले आहे. तीन तासांच्या प्रदीर्घ बैठकीनंतर शेतकर्यांच्या सर्व प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (शुक्रवारी) विधिमंडळात याबाबत निवेदन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच मुंबईच्या वेशीपर्यंत आलेला मोर्चा परतेल, असे मोर्चाचे नेते व माजी आमदार जीवा गावित यांनी सांगितले.
शेतकर्यांच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी नाशिकपासून ‘लाँग मार्च’ काढला. हा लाँग मार्च ठाण्यापर्यंत आलेला असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार, माजी आमदार गावित, इंद्रजित गावित, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले, उदय नारकर, मंजुळा बंगाळ आदी प्रतिनिधी विधानभवनात चर्चेसाठी आले होते. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री व वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकारने शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करून, याबाबतचे निवेदन विधिमंडळात करण्याचे निश्चित केले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्यांबाबत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाला असून आज सभागृहात निवेदन केले जाईल, असे सांगितले.
अंमलबजावणीनंतरच माघार
आजपर्यंतचा सरकारचा अनुभव चांगला नाही. मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या, तरी याबाबतचे आदेश जारी करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत नाही तोवर ‘लाँग मार्च’ आहे तेथेच थांबेल. अंमलबजावणीनंतरच आम्ही परत जाऊ, असे आंदोलनाचे नेते माजी आमदार गावित यांनी सांगितले.