तिसर्‍या दिवशी संपकरी मागण्यांवर ठाम

पुणे : जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम मोठ्या तीव्रतेने जाणवू लागला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु, अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी असल्याने पंचनामे रखडले आहेत. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे अर्धवट पंचनामे झाले असताना गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.

दरम्यान, शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयांना देखील संपाचा फटका बसला आहे. त्यामुळे संपाचा थेट परिणाम हळूहळू सर्वसामान्य जनतेवर पडण्यास सुुरुवात झाली आहे.

मार्च महिनाअखेर आणि त्यातच पुढील आठवड्यात गुढीपाडवा असल्याने गृह-वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यादृष्टीने दस्त नोंदणी, तसेच वाहन खरेदी करतानाची परिवहन कार्यालयातून होणारी नोंदणी आदी प्रक्रिया ठप्प पडली आहे. विशेषतः शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपातील कर्मचार्‍यांना नोटीस काढल्या असताना याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. संपकरी मागण्यांवर ठाम असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचमाने रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील आठवड्यात अवकाळी पावसाचा सात तालुक्यांना फटका बसला असूून, एका व्यक्तीचा जीव गेला आहे, तर 44.3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर संप सुरू झाला असताना जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील पंचमाने रखडले आहेत. त्यातच बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून संपातील कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र शेतकर्‍यांचे पंचनामे रखडणार नाहीत यासाठी नायब तहसीलदार यांच्यावर जबाबदारी सोपवून स्थानिकांकडून मदतीद्वारे पंचनामे करण्याबाबत आदेश दिले आहेत. स्थानिक शेतकर्‍यांनी देखील परिसरातील गावातील माहिती तत्काळ नायब तहसीलदार यांना देऊन मदत करावी.

  • हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा