उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : अनिल जयसिंघानी या फरारी व्यक्तीच्या फॅशन डिझायनर मुलीने वडिलांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपली पत्नी अमृता हिला एक कोटींची ऑफर दिली. ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केल्यानंतर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांचे नाव पुढे आले आहे. तसेच काही राजकारण्यांच्याही संपर्कात ती होती हे पुढे आले आहे. आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याच्या प्रयत्नाचा हा भाग होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केला. तपास सुरू असल्याने आपण आज कोणाचेही नाव घेणार नाही. पण राजकारण कोणत्या पातळीवर गेले हेच यातून दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फिर्यादीमुळे एका फॅशन डिझायनरला पोलिसांनी अटक केल्याची बातमी काही वृत्तपत्रात आली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संबंधित वृत्त असल्याने त्यांनी याबाबत वस्तुस्थिती सांगावी, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. तेव्हा फडणवीस यांनी याची खळबळजनक माहिती देत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व काही राजकीय मंडळींकडे संशयाचे बोट दाखवले. मागच्या काळात आपल्याला अडकवण्याचे बरेच प्रयत्न झाले. परंतु, काहीच हाती न लागल्याने आपल्या कुटुंबियांच्या माध्यमातून अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

अनिल जयसिंघानी नावाच्या एका व्यक्तीवर 14-15 गुन्हे असून, तो सात-आठ वर्षांपासून फरारी आहे. अनिक्षा नावाची त्याची एक मुलगी आहे. सात-आठ वर्षांपूर्वी ती अमृता फडणवीस यांना भेटली. आपण फॅशन डिझायनर असल्याचे सांगितले. मध्यंतरीच्या काळात तिचा संपर्क नव्हता. पण 2019 नंतर तिने परत माझ्या पत्नीला भेटणे सुरू केले. तिने डिझाइन केलेले कपडे, ज्वेलरी वापरण्यासाठी देत परिचय वाढवला. दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर तिने आपल्या वडिलांना काही चुकीच्या गुन्ह्यात फसवण्यात आले असून, त्यांना सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी विनंती केली. माझ्या पत्नीने त्यांना निवेदन द्यायला सांगितले. नंतर तिने बुकींच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रस्ताव ठेवला. आपल्या पत्नीने तो धुडकावून लावल्यानंतर तिने वडिलांना सोडवण्याकरता एक कोटी तुम्हाला देते असे सांगितले. तिच्या वागणुकीबद्दल संशय आल्यामुळे अमृता यांनी तिच्याशी संपर्क बंद केला. फोन ब्लॉक केला. नंतर तिने अनोळखी नंबरवरून काही फोटो, संभाषणे, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एका बॅगेत पैसे ठेवल्याचा व ती बॅग आमच्या नोकराकडे दिल्याचा बनावट व्हिडीओही पाठवला. ’आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवर्‍याची नोकरी जाईल. माझे सर्व पक्षांशी संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तत्काळ आम्हाला मदतही करा. आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू करा, अशी धमकी देण्यात आली. तेव्हा पोलिसात तक्रार नोंदवावी लागली. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर ती जेवढ्या वेळा अमृताला भेटत असे, किंवा फोन करत असे तेव्हा प्रत्येकवेळी ते टेप करत असे, व्हिडीओ बनवत असे हे उघड झाल्याचे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

पोलिसांनी अनिक्षाची चौकशी केल्यानंतर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांचे नाव पुढे आले. त्यांच्या काळामध्ये आपल्या वडिलांवरील गुन्हे परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती; तुम्ही आल्यावर ती थांबली, असेही तिने सांगितले. आपल्याला अडचणीत आणायचा प्रयत्न झाला, पण काहीच सापडले नाही. त्यामुळे कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला. अनिक्षानेच आपले कोणकोणाबरोबर संबंध आहेत ते दाखवण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांशी झालेले संभाषण पाठवले होते. या प्रकरणाची चौकशी होईलच. या प्रकरणामागे कोणाचा हात आह, राजकीय लोक आहेत का ? हे मी आज सांगू शकत नाही. पण राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चाललो आहोत, याचं मात्र नक्कीच दुःख असल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा