भोर, (प्रतिनिधी) : पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाका कायमस्वरूपी हटवण्यासाठी 2 एप्रिलला सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष समितीने गुरुवारी घेतला. केळावडे येथे समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
यावेळी शैलेश सोनवणे, बाळासाहेब गरूड, लहूनाना शेलार, जीवन कोंडे, माउली शिंदे, आदित्य बोरगे, रामभाऊ मांढरे, शुभम यादव, अरविंद सोंडकर, दादा आंबवले, दादा पवार उपस्थित होते. समितीने फेब्रुवारी 2019 मध्ये खेडशिवापूर, तर एप्रिल 2022 मध्ये कात्रज चौकात नाका हटवण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी टोलनाक्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत भोर, वेल्हे, मुळशी, हवेली, पुरंदर तालुक्यातील एमएच 12 व 14 या वाहनांना टोल फ्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रलंबित असताना टोलप्रशासनाने 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सक्तीने टोलवसुली सुरू केली.
सध्या दररोज टोलवसुलीसाठी स्थानिकांना त्रास होत असून बाचाबाची ते मारहाणीपर्यंत प्रकार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. टोलमाफी नकोच नाका हटाव मागणीने जनता व लोकप्रतिनिधींमध्ये जोर धरला आहे. कोणत्याही परिस्थितीत नाका हटवण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. भोर, वेल्हे, हवेली तालुक्यात समितीच्या माध्यमातून मेळावे घेऊन जागृती केली जाणार आहे. दरम्यान आमदार संग्राम थोपटे यांनी ‘नाक्यावर दररोज टोलवसुलीसाठी वाद होत आहेत, त्यातून गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधितांची तातडीने बैठक बोलवावी’ असे पत्र जिल्हाधिकारी यांना मंगळवारी दिले आहे.
टोलनाका हटाव मागणी जनता व लोकप्रतिनिधींनी केली आहे. आता अंतिम लढा 2 एप्रिल रोजी होईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला शुक्रवारी आंदोलनाचे पत्र देणार आहेत.