अहमदनगर : एच3एन2 इन्फ्लूएन्झामुळे नगर शहरात एका 23 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता वाढली असून प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नगरमध्ये झालेला हा मृत्यू राज्यातील पहिलीच घटना आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी काही दिवसापूर्वी अलिबाग येथे सहलीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने या विद्यार्थ्यास रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आले. प्रथम त्याने वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार घेतले. परंतु, तब्येतीतील गुंतागुंत वाढल्याने त्याची प्रकृती खालावली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दुजोरा दिला आहे.

तरूणाच्या मृत्युमुळे जिल्हा प्रशासन जागे झाले. काल संबंधित तरूणाच्या मृत्युचा अहवाल आल्यानंतर त्यास कोरोना आणि इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवालात आढळून आले. संबंधित तरूणाने उपचार घेण्यास विलंब केल्याचे डॉ. घोगरे म्हणाले. होळीचा सण साजरा केल्यानंतर त्यास ताप व सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसू लागली. बाह्यरूग्ण म्हणून त्याने उपचारही घेतले.

हा तरूण छत्रपती संभाजीनगर येथील असून तो नगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे नातेवाईक आल्यानंतर त्यास एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची प्रकृती झपाट्याने खालावली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली काल वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात तातडीच्या उपाययोजनाबाबत चर्चा झाली.

मृत तरूणाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात कुणीही बाधित असल्याचे आढळून आले नाही. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या रूग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा