लाथाळ्या कायम राहिल्यास मनपा निवडणूक जिंकणे अवघड

पिंपरी वार्तापत्र : नंदकुमार सातुर्डेकर

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. मात्र या निवडणुकीचे कवित्व अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण विजयानंतर भाजपा शिवसेना युतीने जो आभार मेळावा घेतला, त्यात उमेदवारी डावलले गेलेले शंकर जगताप यांनी पोटनिवडणुकीची संधी साधून काही अल्पसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे काम केले. दुःखाच्या प्रसंगात परकीयांसोबत स्वकीयांनीही आमच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राजकीय इच्छा कधी प्रकट करायची तेवढे ज्ञान व भान सर्वांना असले पाहिजे. हा जो हल्लाबोल केला त्यामुळे भाजपमध्ये असलेली खदखद बाहेर आली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा व रॅली हाच काय तो जगताप यांना आधार झाला. स्थानिक भाजप नेत्यांनी ज्या काही गुप्त कारवाया केल्या त्यामुळे अश्विनी जगताप यांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वैयक्तिक करिष्मा, निवडणुकीत विजयासाठी वापरावी लागणारी तंत्रे यावरच अवलंबून राहावे लागले, हे आम्ही निवडणूक निकालानंतरच लिहिले होते. त्याची पुष्टी यातून झाली आहे. भाजपामधील पक्षांतर्गत लाथाळ्या कायम राहिल्यास महापालिका निवडणूक जिंकणे अवघड होणार आहे.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका चांगल्याच लांबल्या असताना दुसरीकडे मात्र चिंचवड आणि कसब्यात पोटनिवडणूक लागली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अवघ्या 21 दिवसांतच चिंचवडला पोटनिवडणूक लागली. त्यामुळे भाजपसह सर्वांचीच दमछाक झाल्याचे दिसले. महाविकास आघाडीत राहुल कलाटे यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपपेक्षा कलाटे यांनाच अधिक लक्ष केले. कलाटे यांना भाजपनेच उमेदवारी अर्ज ठेवायला लावला. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांनी केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत शिवसेनेची मते भाजपकडे जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेच कलाटे यांना उभे केले असा आरोप केला.
या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यात तिकिटासाठी झालेला सुप्त संघर्ष लपून राहिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांना उपस्थित ठेवून दोघांमध्येही कोणतेही वाद नसल्याचे पालकमंत्र्यांना सांगावे लागले. शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यामध्ये तिकिटासाठी एकमत होत नसल्याने भाजप नेत्यांची फरपट झाली. अखेर अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूती मिळेल हा मुद्दा शंकर जगताप यांच्या गळी उतरवून भाजपने कार्यभाग साधला. मात्र अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली, गिरीश महाजन उपस्थित असताना तेथे शंकर जगताप यांची अनुपस्थिती जाणवणारी होती. पुढे राजकारणात पटाईत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकर जगताप यांनाच अश्विनी जगताप यांचे प्रचार प्रमुख करून शंकर जगताप यांना प्रचारस लावले नव्हे तर जुंपले. या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले आमदार सुनील शेळके यांनी अगदी भाजप स्टाईलने प्रचार यंत्रणा बूथ यंत्रणा वापरली. मात्र भाजपाचे असे काहीच दिसले नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींना अश्विनी जगताप या निवडून आल्यास आपल्याला डोईजड होतील या भीतीने ग्रासले होते. त्यामुळे अनेकांनी या निवडणुकीत तटस्थता ठेवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्यानंतर मात्र स्थानिक नेत्यांना देखल्या देवा दंडवत या पद्धतीने नेते आल्यानंतर का होईना पण प्रचारात सहभागी व्हावे लागले. संपूर्ण निवडणुकीत भाजपचे प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी यांचे अस्तित्व जाणवले नाही. शंकर जगताप यांनी पर्यायी प्रसिद्धी यंत्रणा उभारून ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तोडीचे प्रसिद्धीचे काम झाले नाही. त्यामुळे मग निवडणूक जिंकण्यासाठी विजयासाठी जी जी आवश्यक तंत्रे लागतात ती अवलंबण्याची वेळ जगताप कुटुंबावर आली.
पराभवाची जबाबदारी कोणी घेत नाही. मात्र विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आणि आम्हीच जिंकून आणलं हे सांगण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा दिसते. चिंचवड मध्ये अगदी हेच दिसत आहे. अश्विनी जगताप पराभूत व्हाव्यात म्हणून आणि जगताप कुटुंबियांना संपविण्याची हीच संधी आहे या पद्धतीने राजकीय डावपेच कोण खेळले ? महाविकास आघाडीचे नाना काटे, शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना मदत कोणी केली, हे आता बाहेर यायलाच हवे.
राहुल कलाटे यांना केलेल्या मदतीने फारसे काही बिघडले नाही. कारण मत विभागणीत भाजपचाच फायदा झाला आहे. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला ताकद देणार्‍या भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवक व इच्छुक कार्यकर्त्यांचे भाजप काय करणार हा प्रश्न आहे
चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीला दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे दुःखाची झालर होती. या पोटनिवडणुकीत महायुतीने परीक्षा दिली. आता महापालिका निवडणुकीत अब की बार 100 नगरसेवक हे टार्गेट पूर्ण करायचे आहे. महापालिकेवर पुन्हा आपलाच झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी या आभार मेळाव्यात व्यक्त केला. मात्र भाजपामध्ये असलेले अस्तनीतले निखारे जवळ ठेवून महापालिका निवडणुकीत भाजपाला विजय मिळवता येणार नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पराभूत झाले असले, तरी त्यांना 99 हजार इतकी लक्षणीय मते मिळाली आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने कंबर कसून जे काम केले तो टेम्पो असाच कायम राहिला व भाजपमधील पक्षांतर्गत लाथाळ्या कायम राहिल्यासभाजपला महापालिका निवडणुकीत पुन्हा विजय मिळवणे अवघड होऊ शकते. म्हणूनच शंकर जगताप यांनी नुसते शाब्दिक टोले लगावण्याऐवजी भाजपामधील सूर्याजी पिसाळ कोण आहेत त्यांची नावे जाहीर केली पाहिजेत.

शंकर जगताप यांच्या पुनर्वसनाची डोकेदुखी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा लाभ मिळावा यासाठी भाजपने शंकर जगताप यांना बाजूला सारून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर अश्विनी जगताप यांनी आपले अश्रू पुसून ज्या पद्धतीने काम सुरू केले आहे ते पाहता येत्या 2024 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्या आपला दावा सोडतील असे दिसत नाही. त्यामुळे शंकर जगताप यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची डोकेदुखी भाजपपुढे आहे. भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांची मुदत संपली असल्याने त्या जागी शंकर जगताप यांना संधी दिली जाते की महापालिका निवडणुकीनंतर त्यांना एखादे महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते याबाबत उत्सुकता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा