अहमदाबाद : कसोटी सामन्यात विराट कोहलीची शानदार खेळी पाहायला मिळाली. कोहलीने 364 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 186 धावांची खेळी केली. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळानंतर शतक झळकावले. या शतकासह त्याने कसोटी क्रमवारीत 8 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता तो आयसीसी कसोटी क्रमवारीत 705 रेटिंगसह 13 व्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या या खेळीतून त्याला 54 रेटिंग मिळाले. कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. आता तो 739 रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, आर अश्विन गोलंदाजीत अव्वल स्थानावर आहे, त्याने जेम्स अँडरसनला 869 रेटिंगसह मागे टाकले आहे. रवींद्र जडेजा 431 रेटिंगसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.
23 कसोटी आणि 1205 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोहलीच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले. यापूर्वी कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले.
अहमदाबाद कसोटीत शतक झळकावताच, विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात कमी डावात 75 शतके झळकावणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
अक्षर पटेलनेही क्रमवारीत मारली बाजी
अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसाठी बॉर्डर-गावसकर करंडक खूपच चांगला होता. या मालिकेत त्याने एकूण 264 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अक्षरने दोन स्थानांनी झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर त्याने फलंदाजीत 8 स्थानांची लांब उडी घेतली आणि तो 44व्या क्रमांकावर आला.
विशेष म्हणजे भारतीय संघ सलग दुसर्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. यावेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.