समृद्धी धायगुडे
द एलिफंट व्हिस्परर – ऑस्कर विजेता लघुपट
आज या विशेष लघुपटाचे रिव्ह्यू लिहण्याचे कारण म्हणजे खूप दिवसांनी हत्तींवर आधारित असा लघुपट पाहिला. बॉलिवूडमध्ये देखील ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटानंतर विशेष काही या विषयावर आधारित चित्रपट आल्याचे स्मरणात नाही. तर नुकतेच ऑस्कर अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये भारताने ऑस्कर अकादमीमध्ये आपले खाते उघडले. माझ्यासाठी विशेष कौतुकाची बाब म्हणजे दोन महिलांनी केलेला ‘द ऑस्कर व्हिस्परर’ हा माहितीपट आणि त्याला मिळणारे हा पुरस्कार सर्वोच्च मानाचा आणि प्रतिष्ठेचा समाजाला जातो. या माहितीपटाच्या दिगदर्शिका कार्तिकी घोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांचे खरंच करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे मला लघुपट पाहिल्यानंतर लक्षात आले.
आता मुख्य मुद्द्यावर येऊ, ही कथा आहे अन्नामलई पर्वतातील हत्तींच्या कॅम्पमधील.वनविभाकडून काही नैसर्गिक आपत्तींमध्ये गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांना वनविभागाच्या कॅम्पमध्ये आणून उपचार केले जातात. त्याप्रमाणेच हत्तींच्या कॅम्पमध्ये दोन नवजात हत्ती दाखल होतात, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी दोन स्थानिकानावर येते, त्यातून त्या चौघांमध्ये निर्माण होणारे सुंदर नाजूक भावबंध यांचे अतिशय सुरेख वर्णन या लघु पटात केले आहे. निसर्गाचे सच्चे पूजक कोण ?
झाडे तोडून घरात फर्निचर करणारे आपण? की, जंगलात राहून निसर्गाला न ओरबाडता जपणारे स्थानिक? असा प्रश्न हा माहितीपट पाहिल्यावर स्वतःला पडतोच.
चाळीस मिनिटांच्या या लघुपटांत संपूर्ण चित्रीकरण हे नैसर्गिक प्रकाशात झाले आहे. या गोष्टी मुळे लघुपटाचा व्हिज्युअली देखील प्रचंड प्रभाव पडतो. या कलात्मक फ्रेमचा, मानवी भावभावनांतून थेट संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. यापेक्षा आणखी काय अपेक्षा करणार एखाद्या माहितीपटाकडून. इतकी विलक्षण कलाकृती थोडक्यात आणि सुंदर सहजतेने मांडणे हेच तर माहितीपट दिग्दर्शकाचे यश असते. ही सर्व आव्हाने कार्तिकी आणि गुनीतने सक्षमपणे स्वीकारलेली आणि यशस्वी केलेली जाणवतात. एखादी ऑस्कर विजेती कलाकृती कशी असावी याचे आदर्श उदाहरण आहे.
या कथेतील मुख्य पात्र म्हणजे बमन आणि बेल्ली. हे दोघे रघू नावाच्या अनाथ छोटुश्या हत्तीचे पालकत्व स्वीकारतात. रघू त्यांना त्यांच्या अशा परिस्थितीत भेटतो की तो वाचेल की नाही याबाबत सर्वांना खात्री नसते. पण बेल्लीला मात्र तिच्या पालनपोषणावर पूर्ण खात्री असते. ती आणि बमन या दोघांचे आयुष्य रघू भोवतीच फिरत असते. रघूला खायला घालणे, त्याची झोपण्याची जागा साफ करणे, फिरवून आणणे, त्याला जखम झाली तर उपचार करणे असहा सर्व गोष्टी हे दाम्पत्य
अतिशय प्रेमाने आणि मायेने करत असतात. रघू थोडा मोठा झाल्यावर त्याला दुसरीकडे हलवण्यासाठी वनविभागाकडून आदेश येतात. त्यावेळी या तिघांच्या आणि नव्यानेच त्यांच्या कुटुंबात आलेल्या अमूला किती भावना उचंबळून येतात. याचे खूप छान सादरीकरण यात टिपले आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे जंगलावर आणि तेथील जीवांवर होणारा परिणाम त्यामुळेच मानव आणि जंगली श्वापदांना होणारा त्रास हा संदेश देखील बेल्लीच्या सवांदातून आपल्यासमोर येतो. हत्ती खरंच अतिशय हुशार, प्रेमळ, बुद्धिमान प्राणी आहे. मनुष्याच्या बाळा प्रमाणेच त्याचे देखील भरन-पोषण करावे लागते हे अगदी नेमकेपणाने यात टिपले आहे.
बेल्ली आणि बमन हे तामिळनाडूतील पहिले आणि एकमेव दाम्पत्य आहे जे नवजात हत्ती यशस्वीपणे सांभाळू शकतात. एकंदरीतच हत्तींना सांभाळणे अवघड असते पण अनाथ हत्ती किंवा एखाद्या नैसर्गिक प्रकोपातून वाचलेल्या हत्तींना मायेने सांभाळण्याची गरज असते हा प्रमुख फरक यातून जाणवतो. कर्नाटकांत प्रामुख्याने हत्तींच्या कळपाने केलेले हल्ले आपण ऐकले आहेत. मात्र हत्ती हा मुळात जंगली प्राणी आहे. त्यांचा अधिवास जपला, वाढवला तर मनुष्य वस्तीला देखील त्यांच्यापासून काही धोका निर्माण होणार नाही. इतका साधार सरळ संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.
रघू, बमन, बेल्लीच्या आयुष्यात अमू सर्वात लहान नवजात हत्तीचा प्रवेश होतो. त्यावेळी रघू मोठा असून देखील प्राण्यांची कौशल्य तिच्याकडून शिकतो. लहान मूल हे लहान मुलातच वाढत, शिकते असे म्हणतात ते अगदी खरंय. या भावनिक प्रवासात एकमेकांचे कोणीही नसलेले बमन आणि बेल्ली यांच्यात देखील परप्रेम फुलते, विवाह होतो. बेल्लीच्या पूर्वायुष्यात तिचा पती आणि मुलगी दोघे जंगलात अपघाताने मरण पावतात, त्यानंतर देवानेच अमू आणि रघूला मुलांच्या स्वरूपात आमच्याकडे पाठवले आहे, आणि हीच आमची मुले आहेत असे समजून चौघे गोडीगुलाबीने रहात असतात. रघूच्या स्थलांतरानंतर कधी बमन दिसला तरी ती इतक्याच प्रेमाने धावत त्याच्याकडे येतो, हा क्षण खरंच डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय रहात नाही.
एकंदरीतच सर्वांनी आवर्जून पाहावा असा हा संस्मरणीय लघुपट आहे. शक्य झाल्यास निसर्ग, पर्यावरण याविषयी कृतज्ञता बाळगावी.
- दिग्दर्शन : कार्तिकी गोन्साल्विस
- लेखिका : प्रिसिला गोन्साल्विस
- निर्माती : गुनीत मोंगा
- नेटफ्लिक्सवर उपलब्ध