अहमदाबाद : फलंदाज श्रेयस अय्यर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. अहमदाबादमधील चौथ्या कसोटीनंतर श्रेयसने पाठदुखीची तक्रार केली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. आता त्याना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला देखील मुकावे लागले आहे. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. याचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस भारतीय संघाच्या डावात फलंदाजीला आला नव्हता. नंतर, बीसीसीआयने एक अपडेट जारी करत त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याचे सांगितले.

अशाच दुखापतीबद्दल त्याने यापूर्वीही तक्रार केली होती. पाठीच्या दुखापतीनंतरच श्रेयसचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात पुनरागमन झाले होता. मात्र त्याच समस्येने पुन्हा तोंड वर काढले आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप श्रेयसच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही. या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलही खेळू शकणार नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस या दुखापतीसह खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत केकेआरसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

श्रेयस सध्या उपचारांसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे, परंतु त्याला जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारखी शस्त्रक्रिया करावी लागेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. बुमराह, प्रसिद्ध आणि पंत हे आधीच आयपीएल 2023 मधून बाहेर पडले आहेत.

श्रेयस आऊट झाल्याने त्याच्या जागी कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसन, रजत पाटीदार आणि दीपक हुडा यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर, या तीनपैकी कोणत्याही एकाचा समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय राहुल त्रिपाठी हाही पर्याय असू शकतो.

भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत मीडियाला सांगितले – दुखापती हा खेळाचा एक भाग आहे. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट मेडिकल टीम उपलब्ध आहे आणि ते सर्व प्रकारे सक्षम आहेत. आमची एनसीएशीही चर्चा सुरू आहे. श्रेयस या मालिकेतून बाहेर पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा