पिंपरी : H3N2 आजारामुळे आज पिंपरीत ७३ वर्षीय एका वृद्धाचा मृत्यू झाला. या रुग्णाला दमा व हृदयाचा त्रास होता त्याला दिनांक सात मार्च रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले होते. नियमित तपासणी केल्यानंतर H3N2 तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास या रुग्णाचे निधन झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली. या मृत्यूमुळे आता राज्यात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
सध्या राज्यातच नव्हे, तर देशभरात H3N2 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे ५३ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर इथला आहे.