मुंबई : राज्यातील गोरगरिबांच्या प्रवासाचे एकमेव साधन असलेल्या एसटीच्या वाहक-चालकांच्या विश्रांतीस्थळांची (रेस्ट रूम) त्वरित सुधारणा करण्यात येईल. त्याबाबतचे आदेश तातडीने काढले जातील. तसेच अधिवेशन कालावधी संपल्यानंतर सर्व आगारांना, एसटी स्थानकांना भेटी देण्यात येतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी दिले.

एसटी कर्मचार्‍यांच्या एकूणच मागण्यांबाबत दर चार वर्षांनी अधिकृत संघटनेशी करार होत असतो. त्या कराराप्रमाणे एसटी चालक-वाहकांचा रात्रपाळी भत्ता ग्रामीण भागात 9 वरून 75, जिल्हा स्तरावर 11 रुपयांवरून 80 रुपये व मुंबईसारख्या शहरांसाठी 15 वरून 80 रुपये रात्रपाळी भत्ता केला असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

वाहक- चालकांच्या विश्रांतीस्थळांची दुरवस्था असून अनेकदा त्यांना गाडीतच विश्रांती घ्यावी लागते. कधी कधी तर वाचक-चालक गाडीच्या टपावरच झोपतात. त्यामुळे त्यांना खरोखरच विश्रांती मिळेल अशा पद्धतीचे त्यांचे विश्रांतीस्थळ असावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

मनीषा कायंदे आणि उमा खापरे यांनी प्रत्येक एसटी आगारात आणि अनेक एसटी स्थानकात महिला प्रवासी आणि महिला एसटी कर्मचारी यांना भेडसावणार्‍या समस्यांचा पाढा वाचला.

राज्यात एसटीच्या गाड्या फारच कमी आहेत. अनेक ठिकाणी गाड्या बंद केल्या आहेत. आता बंद असलेल्या ठिकाणी एसटीच्या वस्तीच्या गाड्या सुरू कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एसटी सेवा देण्यात यावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा