नवी दिल्ली : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा सातत्याने आरोप करणार्‍या विरोधकांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मात्र, विजय चौकातून विरोधी पक्षाचे नेते पुढे जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले.

या मोर्चात काँग्रेससह समविचारी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. मोदी सरकारने 200 जणांना रोखण्यासाठी 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. आजही असाच प्रयत्न झाला. यातून लोकशाहीचे वास्तव समोर येते, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

तसेच, ब्रिटनमधील वक्तव्यासंदर्भात राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही खर्गे म्हणाले. या मोर्चात ममता बँनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नव्हता. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी काल एलपीजी दरवाढीच्या विरोधात संसद परिसरात सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच, आम्ही सात दिवस विविध प्रश्‍नांवर निदर्शने करणार असल्याचे सांगितले.

विरोधकांचे ईडीला पत्र

अदानी प्रकरणावरुन विरोधकांनी सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी, अदानी समूहाविरोधातील आरोपांची चौकशीची मागणी करण्यात आली. तसेच, शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक अफरातफरीसह अन्य भ्रष्टाचाराची चौकशीची विनंती केली. ते अधिकार क्षेत्राचा त्याग करु शकत नाहीत, असेही म्हटले आहे. या पत्रामध्ये काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा, आययूएमएल, व्हीसीके, केरळा काँग्रेस आदी नेत्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा