मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात एन्फ्लूएन्झाच्या विषाणूचे एच-1एन-1 आणि एच-3एन-2 असे दोन प्रकार आढळून आले आहेत. राज्यात 361 जणांना याची बाधा झाल्याचे आढळून आले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला सावध आणि सतर्क करण्यात आले असून ऑक्सीजन प्रकल्पही तयार ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेचा दर तीन तासांनी आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल विधानसभेत देशात व राज्यात पसरत चाललेल्या एन्फ्लुएन्झाच्या संसर्गाचा मुद्दा उपस्थित केला. यावर निवेदन करताना आरोग्य मंत्री सावंत यांनी राज्यात एन्फ्लुएन्झा या आजाराने दोघा जणांचा मृत्यू झाला असून या आजाराची लक्षणे असलेले इतरही रूग्ण सापडले असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणेला तयार आणि सतर्क करण्यात आले असून ऑक्सीजन प्रकल्पही सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणेचा दर तीन तासांनी आढावा घेण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती सावंत यांनी दिली. नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले

Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing