मुंबई, (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत याचे रणशिंग फुंकण्यात आले. आघाडीचे प्रमुख नेते राज्यात सात संयुक्त सभा घेणार असून, याची सुरुवात 2 एप्रिलला संभाजीनगर येथून होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई अंतिम टप्प्यात आलेली असताना दुसरीकडे जनतेच्या न्यायालयात संघर्षाचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते, तसेच तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
राज्यात आघाडीच्या सात सभा
शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीच्या सात सभा होणार आहेत. याची सुरुवात 2 एप्रिलला संभाजीनगर येथून होईल. यानंतर नागपूर-16 एप्रिल, मुंबई-1 मे, पुणे -14 मे, कोल्हापूर -28 मे, नाशिक-3 जून व अमरावती येथे 11 जून रोजी आघाडीच्या नेत्यांची संयुक्त सभा होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मनमानी कारभार, मागणी, पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना मदत न मिळणे, बेरोजगारी आदी विषयांवर सरकारला घेरण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.