सौर ऊर्जेचा वापर वाढविणे काळाची गरज

सध्या अनेक ठिकाणी डिझेल व पेट्रोल वरील वाहने दिसतात. हळूहळू त्याची जागा आता इलेक्ट्रिक वाहनांनी घेणे सुरू केले आहे. अर्थातच पेट्रोल डिझेलवर चालणार्‍या गाड्यांमुळे पर्यावरणाची हानी होते. इलेक्ट्रिक वाहनांमुळेसुद्धा चार्जिंग व पर्यावरणावरील ताण निर्माण होत आहे. मुख्यत्वे वीजनिर्मितीसाठी आजही कोळशाचा प्रचंड प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कोळसा वापरणे, हीसुद्धा पर्यावरणाची एक प्रकारे हानीच आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर चालणारे वाहन बनविले, तर मात्र पर्यावरण व इंधन बचत हे दोनही उद्देश सध्या होऊ शकतात. सूर्याचा प्रकाश हा आपणास सतत मिळत राहतो. त्यामुळे त्यापासून मिळणार्‍या ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त केल्यास मोठी आर्थिक बचत होऊ शकते, तसेच पर्यावरणाचीसुद्धा हानी होत नाही. एका आकडेवारीनुसार सूर्याच्या ऊर्जेपासून भारताच्या भूमीवर प्रत्येक चौरस मीटरवर एका तासात पाच ते सात किलोवॅट इतकी वीज उपलबध होत राहणार आहे. एक हिशोब मांडल्यास असे दिसते की वर्षभरात 60000 अब्ज मेगावॅट अवर इतकी वीज उपलबध होईल. यामुळे शून्य प्रदूषण होणार आहे. ही ऊर्जा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. वाहनांचा आवाज कमी होणार आहे. यामुळे निसर्गात निर्माण होणार्‍या सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करणे हितावह ठरेल.

शांताराम वाघ, पुणे

उत्तरे आपणच शोधायची

रस्त्यांचे डांबरीकरण रखडले ही तक्रार नेहमीचीच आहे. नेमेची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दरवर्षी पावसाळापूर्व रस्ते व त्यांचे डांबरीकरण केले जाते, याबद्दल धन्यवाद! परंतु हे डांबरीकरण फारच रेंगाळते, पाऊस सुरू झाला तरी डांबरीकरण चालूच असते. वाहन चालकांनी, पादचार्‍यांनी गडबडीत रस्त्यावरून सांभाळून जावे. तसा फलक फार तर लावला जाईल की रस्त्याचे डांबरीकरण चालू आहे, जरा जपून जा रे नागरिका. आता हे डांबरीकरण का ठप्प होते, तर त्याला जिवंत उदाहरणे आहेत. म्हणजे ठेकेदार फसवणूक करतात, पैसे वाढवून मागतात. या कामांची निरनिराळी पॅकेजेस असतात. त्यावरून महानगरपालिकेत वादंग निर्माण होतात, मग ती रद्द करून नवीन पॅकेजेस निर्माण व्हायला वेळ लागतो. कुठलीतरी आचारसंहिता आडवी येते, मग फेरनिविदा काढाव्या लागतात. असे प्रश्न आपण विचारायचे व उत्तरेही आपणच शोधायची, म्हणजे कामात जिवंतपणा दिसून येतो.

गोपाळ द. संत, पुणे

गॅस सिलिंडरची किंमत वाढता वाढे

जनता आधीच महागाईच्या आगीत होरपळत असताना 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढले आले आहेत. घरगुती सिलिंडरचे आता दर प्रतिसिलिंडर 1102 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. परिणामी होळी आणि गुढीपाडव्याच्या सणांच्या काळातच सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचे चटके बसले आहेत. दुसरीकडे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही 350.50 रुपयांची वाढ झाल्यामुळे एका सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये इतकी झाली आहे. यामुळे रेस्टॉरंटमधील जेवणही महागणार आहे. विशेष म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2017 ते 1 मार्च 2023 या सहा वर्षांच्या कालावधीत एलपीजी गॅसच्या किमती 59 वेळा वाढल्या असून, परिणामी एलपीजी सिलिंडरच्या दरात एकूण 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2017 रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत 723 रुपये होती, तर 1 मार्च 2023 पर्यंत त्यात 52 टक्के वाढ होऊन सिलिंडरची किंमत 1102 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एका ठराविक कालावधीनंतर सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

प्रदीप शंकर मोरे, मुंबई

खलिस्तानवाद्यांचा वेळीच बंदोबस्त करा

चार दशकांपूर्वी ज्या खलिस्तानवाद्यांनी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते, ज्यांनी भारताच्या एका महान पंतप्रधानांची आणि पंजाबच्या काही मुख्यमंत्र्यांची हत्या केली ते खलिस्तानचे भूत पुन्हा एकदा भारताच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. चार दशकांपूर्वी जर्नलसिंग भिंद्रनवाले यांनी स्वतंत्र खलिस्तानसाठी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते. आता तेच काम वारीस दे पंजाब ही संघटना करत आहे. वारीस दे पंजाब ही संघटना खलिस्तान समर्थक असून, या संघटनेला परदेशातून पाठबळ मिळत आहे. अर्थात खलिस्तानवाद्यांना परदेशातून पाठबळ मिळणे ही नवी बाब नाही. कदाचित हा प्रश्न संवेदनशील असल्याने सरकार प्रत्येक पावले विचारपूर्वक टाकत असेल, मात्र हे करताना खलिस्तानचे हे भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसू नये याचीही काळजी सरकारने घ्यायला हवी. कारण हे भूत जर पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसले, तर ते भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वालाच आव्हान देऊ शकते.

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा