नवी मुंबई : डीवाय पाटील स्टेडियमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अव्वल स्थानासाठी रंगतदार सामना झाला. प्रथम फलंदाजी करणार्या दिल्लीच्या आख्ख्या संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी 105 धावांवर गारद केले. त्यानंतर 106 धावांचा पाठलाग करणार्या मुंबईच्या संघाने दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मुंबईने 8 गडी राखून 106 धावांचे लक्ष्य गाठले आणि विजयाच्या हॅट्ट्रिकला गवसणी घातली.
मुंबईसाठी सलामीला उतरलेल्या यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज खेळी केली. पण एलिस कॅप्सीच्या गोलंदाजीवर हेलीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानात असलेल्या जेमिमा रॉड्रीग्जने हवेत उडी मारून हेलीचा अप्रतिम झेल घेतला. महिला प्रिमीयर लीगमधील आतापर्यंतचा उत्कृष्ट झेल घेतल्याने जेमिमावर कौतुकाचा वर्षाव होता आहे. जेमिमाने हवेत उडी मारून घेतलेल्या झेलचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिल्लीने मुंबईसमोर 106 धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबईच्या सलामीवीर फलंदाज यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यास्तिकाने चौफेर फटकेबाजी करत 32 चेंडूत 41 धावा कुटल्या. तर हेलीने 31 चेंडूत 32 धावांची खेळी साकारली. पण यास्तिका भाटियाची तंबूत परतल्यानंतर मुंबईच्या धावसंख्येचा वेग मंदावला. त्यानंतर हेली मॅथ्यूही 32 धावांवर एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर नॅट सिवर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईचा डाव सावरला आणि 15 षटकांत 106 धावांचे लक्ष्य गाठून सलग तिसर्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
मुंबई इंडियन्सच्या सायका इशाकने 13 धावा देत 3 बळी घेतल्या. तसेच इसी वँगनेही भेदक गोलंदाजी करून 3 बळी घेतल्या आणि हेली मॅथ्यूजनेही 19 धावांमध्ये 3 बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्ले मध्येच जखडून टाकले होते. शफाली वर्माचा बळी गेल्यानंतर दिल्लीची धावसंख्येत घसरण झाली. दिल्लीने पाच षटकांत 25 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला 18 षटकांमध्ये 105 धावांपर्यंतच मजल मारता आली.