पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट; पिकांना फटका

पुणे : मागील आठवड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरले नाहीत, तोपर्यंत आज (गुरुवार) पासून पुन्हा पावसाचे संकट उभे राहणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने बुधवारी दिला आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या शनिवारपर्यंत पाऊस असणार आहे.

शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज घेऊन हरभरा, गहू पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तीन दिवस विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे पाऊस आणि गारपीट झाल्यास फळभाज्या, पालेभाज्या, द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज आणि डाळिंबाच्या बागांनाही फटका बसणार आहे. ज्या शेतकर्‍यांना पिकांची काढणी शक्य आहे. तसेच, शक्य त्या फळांची तोडणी करावी, असे आवाहन केले आहे.

मागील 24 तासांत विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी किचिंत वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात काल ब्रम्हपुरी येथे उचांकी 38.9 अंश कमाल, तर जळगाव येथे नीचांकी 15.8 अंश किमान तपमानाची नोंद झाली. रविवारी राज्यातील काही भागात पाऊस कायम राहणार आहे.

पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस

शहर आणि परिसरात बुधवारी रात्री मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पावसाला सुरूवात होण्याआधी आकाशात ढगाची दाटी झाली होती. त्यानंतर मेघगर्जनेला सुरूवात झाली. मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आश्रयाला थांबावे लागले. रस्त्यांवरील वाहनांची गर्दीही कमी झाली. पावसामुळे रस्त्यांवर थांबून खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणार्‍यांची साहित्याची आवराआवर करताना धावपळ झाली. सुमारे 10 ते 15 मिनीट पाऊस पडला. या पावसाचा व्यवहारावर परिणाम झाला. त्यामुळे मध्य वस्तीतील बाजारपेठेत काही काळ गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पावसामुळे काही भागातील वीज गेली होती. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अनेकांनी रात्री घराबाहेर पडणे टाळले. आज (गुरूवार) पासून येत्या रविवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी पाऊस थांबेल. मात्र ढगाळ वातावरण कायम असणार आहे. शहरात काल 34 अंश कमाल, तर 19.4 अंश किमान तपमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कमाल आणि किमान तपमानात घट होणार आहे. हवेतही गारवा असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा