स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड
16-मार्च-1897 (मंगळवार)- आजच्या दिवशी, लोकमान्यांचा ’केसरी’ मध्ये प्रसिद्ध अग्रलेख – ’पुण्यात सध्या चालू असलेला धुमाकूळ’. त्यात ते लिहितात- ’साथीच्या रोगामुळे यंदा पुण्यात शिमगा आठ-दहा दिवस आधीच सुरू झाला, असे हल्ली ठिकठिकाणी घरातील कपड्यांच्या ज्या होळ्या होत आहेत, त्यावरून वाटण्याचा संभव आहे. ज्या घरात रोगी आढळला त्यावर तांबडी रेघ खुणेकरिता घातली जात असे. त्यापाठोपाठ धुरी देणारे पथक येऊन घर स्वछ धुपवून टाकले जाई, मग चुना देणारे पथक येत असे. तांबड्या खुणेचा अर्थ ’रुग्ण आढळला’ इतपतच होता. पण काही ठिकाणी त्याचा अर्थ, ती घरे जाळून रोग नष्ट करा, असा घेतला गेला आणि घरेदारे जाळली गेली’.
(सरकारने, प्लेगच्या रोग्यांसाठी काढलेले हॉस्पिटल, मध्यम स्थितीतल्या लोकांच्या राहणीला जुळणारे नव्हते, म्हणून लोकमान्य टिळकांनी सामान्य लोकांसाठी ’हिंदू प्लेग हॉस्पिटल’ ची स्थापना केली).
प्लेगवरील उपाययोजनेच्या कामात सैनिकांना रुजू करून घेतल्याबद्दल लोकमान्य टिळकांनी वरील अंकात सौम्यच शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणतात- ’या सोजिरांना का बोलावण्यात आले आहे, हे आम्हाला कळत नाही. गव्हर्नरसाहेबांच्या भाषणात असा काही उल्लेख केलेला नव्हता. मुंबईत सोजिरांचा वापर झालेला नाही. कोणा तरी दुय्यम पदावरील अधिकार्याच्या डोक्यातून ही शक्कल निघाली असावी, असे आम्हाला वाटते. तरीही गोर्या सैनिकांचं कौतुक करण्याइतकं औदार्य टिळकांकडे होतं. ते पुढे म्हणतात- ’सोजिरांना बोलावण्यात आले असले, तरी ते कायद्याने वागत आहेत, ही संतोषाची बाब आहे. गोर्या सैनिकांनी लोकांच्या घरांमध्ये घुसून देव-देवता भ्रष्ट केलेल्या तक्रारीसंदर्भात टिळक म्हणतात की, यामध्ये गोर्या सैनिकांसोबत येणार्या ’नेटिव्ह गृहस्थांची विशेष चूक आहे. गोर्या सैनिकांना स्वाभाविकपणे हिंदूंच्या रूढी माहीत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या एतद्देशीय मदतनीसांनी त्यांना योग्य सूचना देणे गरजेचे होते. वास्तविकत: अशा शोधपथकाची गरज नव्हती, असेही ते पुढे म्हणतात. रुग्णांची माहिती न देणार्यांना शिक्षा केली जाईल, असा केवळ आदेश सरकारने काढला असता, तरी हा सर्व धुमाकूळ थांबवता आला असता’.
सैनिकांच्या स्वैराचारविरोधात तक्रारी करणारी पुण्यातील नागरिकांची पत्रे ’केसरी’ मध्ये छापली जात होती. प्लेगवरील उपायांमुळे लोकांमध्ये आत्यंतिक संताप निर्माण झाल्याचे या पत्रांमधून स्पष्ट होत होते. प्लेग समितीसमोर सादर केलेल्या एक निवेदनात पुण्यातील अग्रणी नागरिकांनी सैनिकांच्या गैरवर्तनाबाबत अनेक गंभीर तक्रारींचा पाढा वाचला होता.